वर्धा : चिमुकलीवरील अमानुष अत्याचाराचे प्रकरण ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरल्यानंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी विविध संघटना सरसावल्या आहेत. चिमुकलीवर सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिच्यावर महागडा उपचार करण्याची आर्थिक स्थिती तिच्या कुटुंबीयांची नाही, ही बाब लक्षात घेऊन तिच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च कस्तुरबा हेल्थ सोयायटी उचलणार आहे.जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी मंगळवारी सेवाग्राम रुग्णालयाला भेट देऊन चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी ज्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करुन चिमुकलीला जीवनदान दिले. त्या स्त्री विभाग प्रमुख डॉ. पुनम शिवकुमार यांचीही भेट घेतली. डॉ. शिवकुमार यांनी चिमुकलीच्या प्रकृती काळजी अतिशय योग्यरित्या घेतली जात असल्याचे सांगितले. कुरसंगे यांनी कस्तुरबा हेल्थ सोयायटीचे सचिव डॉ. बी.एस. गर्ग यांची भेट घेतली. सदर चिमुकलीचा उपचाराचा खर्च उचलण्याची आर्थिक स्थिती तिच्या कुटुंबीयांची नाही. ही बाब लक्षात आणून दिली. तेव्हा डॉ. गर्ग यांनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या उपचारावर संपूर्ण खर्च कस्तुरबा हेल्थ सोयायटी उचलणार असल्याची ग्वाही दिली. त्यांनी ‘लोकमत’शी बोलतानाही या वृत्ताला दुजोरा दिला. चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर सेवाग्राम रुग्णालयात तिला गंभीव अवस्थेत उपचारार्थ भरती करण्यात आले होते. तिची गंभीर अवस्था पाहुन स्त्री विभागाच्या प्रमुख डॉ. शिवकुमार या कमालीच्या व्यथीत झाल्या होत्या. त्यांनीच सुमारे अडीच तास त्या चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली.(जिल्हा प्रतिनिधी)
सेवाग्राम रुग्णालय चिमुकलीवर मोफत उपचार करणार
By admin | Updated: August 26, 2014 23:39 IST