हिंगणघाट : गतवर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली. हे अनुदान आले असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ते जमा झाले नाही. याबाबत दोनदा निवेदन देऊनही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही़ यामुळे किसान अधिकार अभियानने शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. २०१३-१४ या वर्षाच्या शेती हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले़ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक मागविण्यात आले. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी खाते क्रमांक दिले; पण अनेकांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. शासनाकडून २१ हजार ७०० शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत १० कोटी ३१ लाखाचे अनुदान तहसील कार्यालयास प्राप्त झाले़ पैकी २० हजार ९९० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार दीपक करंडे यांनी दिली. उर्वरित ७१० लाभार्थ्यांकरिता ५५ लाखांची मागणी शासनाकडे केल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने नुकसान भरपाई पाठविली. तहसील कार्यालयाने बँकेत पाठविली; पण संबंधित खात्यात जमा झाली नाही. शेतकरी संबंधित बँकेत चकरा मारून वैतागले़ अधिकारी उद्धट वागणूक देतात़ शेतकरी आर्थिक संकटात असल्याने आर्थिक मदत गरजेची आहे़ यामुळे त्वरित अनुदान द्यावे, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणाी किसान अधिकारने लावून धरली. यावेळी प्रवीण उपासे, बालू भोयर, शंकर जामूनकर, प्रवीण कलोडे, राजू मून, रणजीत हाते, नरेश हाते आदी उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)
रकमेकरिता शेतकऱ्याचा तहसील कार्यालयात ठिय्या
By admin | Updated: August 29, 2014 00:01 IST