आॅपरेशन मुस्कान : महिन्याभरात सापडली २५ बालके वर्धा : जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या बालकांच्या तक्रारी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत. या बेपत्ता बालकांचा शोध पोलीस विभागाच्यावतीने सुरू असताना राज्य शासनाच्या आदेशाने आॅपरेशन मुस्कान राबविण्याच्या सूचना आल्या. ही विशेष मोहीम राबविण्याचा कालावधी संपला असताना अद्यापही १४ बालके बेपत्ता असल्याचे दिसून आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार १ ते ३१ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम ‘आॅपरेशन मुस्कान’च्या नावाने राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलताना व इतर कामे करताना आढळलेल्या बालकांचा शोध घेण्याचे आदेशित होते. यानुसार जिल्हा पोलिसांच्यावतीने शोध मोहीम राबविण्यात आली. या एका महिन्यात केलेल्या कारवाईत जानेवारी २०१० ते ३० जून २०१५ या काळातील बेपत्ता बालकांचा शोध घेण्यात आला. या काळात १३ मुले व २६ मुलींचा अशी एकूण ३९ मुले बेपत्ता होती. यापैकी २५ बालकांचा शोध लागला आहे. त्यात ८ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. पोलीस विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली असतानाही एकूण १४ मुले बेपत्ताच असल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात नऊ मुली व पाच मुलांचा समावेश आहे.शहरात व जिल्ह्यात पोलीस विभागाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली. यात पोलिसात गुन्हे दाखल नसलेली बरीच बालके पोलिसांच्या हाती आली आहे. त्या बालकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. अशी १४ बालके पोलिसांच्या हाती आली असून यात सहा मुले व आठ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १२ मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यात पाच मुले व सात मुलींचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन बालकांना बालसंरक्षण समितीकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.बालमजुरी व बालकामगारांवर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली होती. या विशेष मोहिमेचा कालावधी संपला असला तरी बालकांचा शोध सुरूच राहणार असल्याचे जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मोहिमेअंती १४ बालके बेपत्ताच
By admin | Updated: August 15, 2015 02:06 IST