प्रवीण मुंडे : पथनाट्यातून केली जनजागृती समुद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत खोटी बतावणी करणारे नागरिकांना फसवतात. अनेकांना अनोळखी नंबर वरुन फोन येत अगदी गोड भाषेत बोलणारा तुमच्याकडून एटीएमचा सोळा अंकी नंबर आणि पिनकोड विचारतो. त्याचाच वापर करून तो तुमच्या बँक खात्यातील रक्कम आपल्या खात्यात वळती करतो. फसव्या जाहिराती व अनोळखी व्यक्तींच्या भुलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. माहिती तंत्रज्ञानाच्या युगावात नागरिकांनी दक्ष राहून सायबर गुन्ह्यांना आळाघालण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समुद्रपूरचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना व पोलीस ठाणे समुद्रपूरच्यावतीने स्थानिक विद्या विकास महाविद्यालयात ‘सायबर सुरक्षा’ याविषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य राजविलास कारमोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलचे कुलदीप टाकसाळे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. नयना तुळसकर, प्रा. मेघश्याम ठाकरे, प्रा. विलास बैलमारे, प्रा. डॉ. स्वाती येवतकर यांची उपस्थिती होती. ठाणेदार मुंडे यांनी मार्गदर्शन करताना विविध उदाहरणे देत सायबर गुन्हे म्हणजे काय, घ्यावयाची दक्षता यावर माहिती देत दक्षताच हीच सायबर गुन्ह्याला रोखण्याचा पर्याय असल्याचे सांगितले. कुलदीप टाकसाळे यांनी अनोळखी व्यक्तीला एटीएमचा गोपनीय नंबर सांगू नये, सोशल मिडीयावर धार्मिक भावना भडकविणाऱ्या मजुकरावर विश्वास ठेवू नये, अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारु नये, आपल्याला लॉटरी लागली ते मिळविण्याकरिता बँक खात्यात रक्कम भरा आदी विषयावर पथनाट्याच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सायबर दिंडी उपक्रमाचे प्रकाश झाडे, सचिन गाडवे, निलेश सडमाके, सतीश घवघवे, धनराज सयाम, योगीता मसराम, सोनाली साहूरकर, प्रकाश खैरकार सहभागी झाले होते. यशस्वीतेकरिता प्रा. चंद्रकांत सातपूते, अजय घुसे, स्वप्नील वाटकर, निरज वैरागडे, चेतन पोहदरे, अक्षय वाटकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)
दक्षताच सायबर गुन्हेगारीला रोखण्याचा पर्याय
By admin | Updated: February 27, 2017 00:38 IST