सोहम पंड्या : ‘रेन हॉर्वेस्टिंग अॅण्ड वॉटर कन्झर्वेशन’वर कार्यशाळावर्धा : पाणी तारक आहे, पाणी विध्वंसक आहे आणि पाणी विवेकी आहे. पाण्याचे स्रोत नदी, नाले, झरे, भूजल आणि सर्वात महत्त्वाचे पावसाचे पाणी आहे. प्रचंड पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याच्या संधारणाची आणि नियोजनाची कोणतीही योजना प्रभावीपणे राबविली जात नाही. यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी अनमोल नैसर्गिक देणगी आहे. तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. शासकीय योजनांवर विसंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारण करावे, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. सोहम पंड्या यांनी केले.स्थानिक जनहित मंचच्यावतीने ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र दत्तपूर येथील सभागृहात ‘रेन हार्वेस्टिंग अॅण्ड वॉटर कन्झर्वेशन’ विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. मार्गदर्शक म्हणून जलतज्ज्ञ डॉ. सोहम पंड्या उपस्थित होते. उद्घाटन जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, सोशल फोरमचे अभ्युदय मेघे, आॅर्किटेक्ट असो.चे पंडित, जनहित मंचचे डॉ. राजेश पावडे आदी उपस्थित होते.डॉ. पंड्या पुढे म्हणाले की, उपलब्ध पावसाच्या पाण्याचे नियोजन व संधारण शास्त्रियदृष्ट्या पावसाचे पाणी गोळा करणे, पाण्याचे साठवण करणे, पावसाचे पाणी शुद्ध करून त्याच्या साह्याने जमिनीत पाण्याच्या साठ्याची पातळी वाढविणे, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करणे या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यास संपूर्ण प्रक्रियेत लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून अधिकाधिक लोकांनी आपल्या राहत्यास घरी पाणी बचतीचा विडा उचलला पाहिजे. जलसंधारण करण्यासाठी इमारतीचे छत, घराचे छत, गच्ची यांचा उपयोग करून जल संधारण केल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळतील. जलसंधारण केल्याने जल स्त्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागेल. भूजल पातळी वाढेल. पाणी खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होईल. जमिनीची धूप काही प्रमाणात थांबते. गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती सोप्या आहे. त्या बांधणे, वापरणे व निगा राखण्यास अत्यंत सोप्या आहेत, असेही डॉ. पंड्या यांनी सांगितले.सतीश बावसे यांनी या गंभीर समस्येवर उपाय म्हणून नागरिकांनी घराचे बांधकाम करताना ‘रेन हॉर्वेस्टिंग’ प्रणालीचा उपयोग केला तर पाण्याची समस्या कमी होऊ शकते, असे सांगितले. डॉ. आसमवार यांनी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई व दुष्काळसदृश स्थिती चिंतेची बाब आहे. पाण्याचे संवर्धन व संरक्षण करणे हाच उपाय आहे, असे सांगितले.कार्यशाळेला संयोजक डॉ. जयंत मकरंदे, प्रमोद गिरडकर, प्रशांत वकारे, सुभाष पाटणकर, प्रा. दिनेश चन्नावार, मनोहर पंचारिया, अलोक बेले, डॉ. दिनकर पुनसे, पदम ठाकरे, नंदू नरोटे, अनूप भुतडा, दीपक भुतडा, डॉ. अरविंद घोंगडे, प्रशांत लांबट, सीमा लांबट, मकरंद उमाळकर, अनिल पाखोडे, दिव्यांश वकारे, प्राचार्य देशपांडे, पवन बोधनकर, अविनाश सातव, डॉ. विलास ढगे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. मेशकर, डॉ. सातपुते, डॉ. भलमे, मिलिंद व सोनाली केदार, श्रीकांत दोड आदी हजर होते.(कार्यालय प्रतिनिधी)
जलसंधारणाची योजना नसल्याने तीव्र पाणीटंचाई
By admin | Updated: April 27, 2016 02:22 IST