घोराड : शिधापत्रिकांचे नूतनीकरण होऊन आता संगणकीकृत पत्रिका सर्वांना मिळणार होत्या. पण ते ग्राहकांसाठी दिवास्वप्न ठरले आहे. त्यामुळे नूतनीकरण करण्यासाठी आठवडी बाजाराच्या गावात शिबिराचे आयोजन करावे, अशी सर्वसामान्यांमधून केली जात आहे. शासनाद्वारे राजस्व अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्रासाठी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत सहजरित्या व कमी खर्चात पोहचत आहे. ही फलश्रृती असली तरी शिधापत्रिकेचे नूतनीकरण व विभक्त झालेल्या कुटुंबाच्या नवीन शिधापत्रिकेसाठी तहसील कार्यालय गाठावे लागत आहे. पाच वर्षाअगोदर संगणकीकृत शिधापत्रिका मिळणार असल्याचे सांगुन अर्ज भरून घेतले होते. तद्नंतर एक वर्षाअगोदर पुन्हा नूतनीकरणाच्या नावावर स्वस्त धान्य दुकानातून अर्ज स्वीकारण्यात आले पण अमलबजावणी झाली नाही. विभक्त झालेल्या कुटुंबांना वेगळ्या शिधापत्रिका तयार कराव्या लागत आहे. त्यामुळे शिबिराच्या माध्यमातून शिधापत्रिकेचे नूतनीकरण केल्यास सर्वसामान्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असल्याने ही मागणी केली जात आहे.(वार्ताहर)
संगणकीकृत शिधापत्रिका ठरले दिवास्वप्न
By admin | Updated: September 9, 2014 23:55 IST