पशुसंवर्धन विभागाच्या योजना : जि.प. प्रशासनाने घेतला आढावावर्धा : जि.प. पशुसंवर्धन विभागाद्वारे विविध योजना राबविल्या जातात. यातील विशेष घटन योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचे ७५ टक्के अनुदानावर वितरण करण्यात येत आहे. केवळ वाटपच नव्हे तर त्या जनावरांची योग्य देखभाल शेतकरी, गोपालकांना करता यावी यासाठी प्रशिक्षण व पशुखाद्य पुरविण्याची योजनाही आखण्यात आली आहे. या योजनेमुळे दुभत्या जनावरांची संख्या वाढणार असून शेतीला दुग्ध व्यवसायाची जोडही मिळणार आहे.केवळ अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांकरिता विशेष घटक योजना राबविण्यात येते. यात ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप, १०० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करणे, नि:शुल्क तीन दिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण घेण्यात येते. आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेंतर्गत केवळ अनु. जमाती समाजातील लाभार्थ्यांकरिता ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप, १०० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करणे व ५० टक्के अनुदानावर तलंगा गट वाटप करण्यात येतात. या योजनांमध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून सर्व समाजातील लाभार्थ्यांसाठी ५० टक्के अनुदानावर तलंगा गट वाटप, १०० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांना वैरण उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येतो. बी-बियाणे, थोंबे पुरविण्यात येतात. जिल्हा परिषदेच्या सेसफंड योजनेत सर्व समाजातील लाभार्थ्यांकरिता ५० टक्के अनुदानावर तलंगा गट वाटप, ७५ टक्के अनुदानावर नर बोकड वाटप करणे, १०० टक्के अनुदानावर देशी, गवळावू वळूंचा पुरवठा करणे, ५० टक्के अनुदानावर दुभत्या जनावरांना पशुखाद्य पुरवठा करणे आदींचा समावेश आहे. पशुसंवर्धन कार्यालयासमोर २०१५-१६ या आर्थिक वर्षात विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ व २, पं.स. स्तरावरील पशुसंवर्धन विभागात माहिती उपलब्ध आहे. या योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जि.प. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
७५ टक्के अनुदानावर होणार दुधाळ जनावरांचे वाटप
By admin | Updated: August 13, 2015 02:47 IST