प्रशांत हेलोंडे - वर्धाहिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणून दिवाळीचा उल्लेख केला जातो़ गरीब-श्रीमंत सर्वच हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी खटाटोप करीत असतो़ दिवाळी म्हटली की, विविध पक्वान्नाचा आस्वाद आलाच! अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ दिवाळी सणासाठी तयार केले जातात़ बाजारपेठाही मिष्टान्नांनी सजलेल्या दिसतात़ सणोत्सवात कुणाच्या आरोग्याला अपाय होऊ नये म्हणून बाजारातील खाद्यपदार्थांची तपासणी अनिवार्य केली आहे; पण जिल्ह्यात यंदा बाजारातील खाद्य पदार्थ व मिष्टान्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या मालाची तपासणीच झाली नसल्याचे समोर आले आहे़दिवाळी सणाची चाहुल लागताच मिठाईच्या बाजारातील हालचालींना वेग येतो़ महिनाभरापूर्वीपासून कच्चा माल बुक करणे, जिल्ह्यात वा परिसरातील ग्रामीण भागातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होत नसल्यास दुसऱ्या राज्यातून दूध, खवा, पनीर, मैदा आदी पदार्थ मागविणे सुरू होते़ हा माल पोहोचण्यासही बराच कालावधी लागतो़ यामुळे आधीच आॅर्डर दिली जाते़ मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची मागणी राहत असल्याने याच काळात भेसळीच्या प्रमाणातही वाढ होते़ सर्वच पदार्थांमध्ये सर्रास भेसळ केली जाते़ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते़ अन्नपदार्थांमध्ये होणारी ही भेसळ नागरिकांच्या जीविताला धोकादायक ठरते़ हा प्रकार लक्षात घेऊनच शासनाने सणोत्सवामध्ये बाजारात उपलब्ध होणारे मिष्टान्न, संबंधित कच्चा माल यांची तपासणी करावी, भेसळयुक्त माल आढळल्यास तो जप्त करावा, असे कडक निर्देश अन्न व औषधी प्रशासन विभागाला दिले आहेत़ यामुळेच अन्न व औषधी प्रशासन विभागाद्वारे दिवाळीपूर्वी तपासणी मोहीम हाती घेतली जाते़ भेसळयुक्त पदार्थांपासून तयार मिष्टान्नातून विषबाधा होऊ नये म्हणून बाजारातील उपहारगृह, हॉटेल, स्वीटमार्ट आदींची तपासणी केली जाते़ यात दूध, खवा, पनीर, मैदा यासह अन्य दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली जाते़ भेसळ केलेले पदार्थ आढळून आल्यास ते जप्त केले जातात़ शिवाय मिष्टान्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचीही तपासणी केली जाते़ दिवाळीपूर्वी संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविली जाते; मात्र वर्धा जिल्ह्यात यंदा ही मोहीम राबविण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे़ यामुळे शहरासह जिल्ह्यातील अन्य भागात मिळणारे मिष्टान्न नागरिकांच्या आरोग्यास योग्य असतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ एकवेळ शहरातील उपहारगृह, स्वीटमार्ट तपासण्यात आले असतील; पण जिल्ह्यातील अन्य ग्रामीण भागातील दुकानांची तपासणी झाली काय, हा प्रश्नच आहे़ ग्रामीण भागात मिष्टान्नामध्ये सर्रास भेसळ केली जाते़ मोठ्या प्रमाणात पदार्थ तयार केले जात असल्याने त्यांचा दर्जाही सूमार असतो़ यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे़ जिल्ह्यात लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात खवा आयात केला जातो़ या खव्याची तपासणी होते काय, हा प्रश्न अनुत्तरीत आहे़ या खव्यामध्ये विविध पदार्थांची भेसळ केली जात असल्याचे विके्रतेच नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात़ याबाबत माहितीसाठी अन्न व औषधी प्रशासनाचे मनोज तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी उत्तर देत नव्हता़
दीप पर्वासाठी सज्ज मिष्टान्न ‘अनहेल्दी’?
By admin | Updated: October 22, 2014 23:21 IST