आष्टी (शहीद) : जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत यांची अमरावती येथे बदली झाली. त्यांना कार्यमुक्त करून तात्पुरता प्रभार लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे यांना मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनी दिला होता. याविरुद्ध कालच्या सर्वसाधारण सभेत जि. प. सभापती व सदस्यांनी आवाज उठविला. अखेर उपविभागीय अभियंता कोठारी यांना पदभार देवून प्रकरणावर पडदा पाडणे पसंत केले. यात रविवारी रजेच्या दिवशी ही कारवाई झाल्याने चर्चा अधिक होत आहे. कार्यकारी अभियंता भागवत यांना नवीन अधिकारी येईपर्यंत कार्यमुक्त करू नका असा आदेश जि.प. अध्यक्ष व सर्व सभापती, सदस्यांनी सीईओ चौधरी यांना दिला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या आदेशाला केराची टोपली देवून आपलीच मनमानी सीईओनी चालविली होती. गत सर्वसाधारण सभा आठवडाभरापूर्वीच झाली होती. त्याच दिवशी सीईओंनी भागवत यांना कार्यमुक्त केले होते. त्यांचा पदभार आर्वी उपविभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. एम. पेंढे यांना देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. मात्र सीईओ चौधरी यांनी पेंढे यांना पदभार न देता लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे यांना पदभार दिला. सहारे यांचे असभ्य वर्तन आणि निधी खर्च न करण्याचे धोरण सर्व सदस्यांनी उजेडात आणले. आम्हाला सदर निर्णय मान्य नाही असा स्पष्ट सूर काढत सदस्यांनी सीईओवर ताशेरे ओढले. तरीदेखील सीईओंनी उपविभागीय अभियंता पेंढे यांना पदभार दिला नाही. मात्र आपल्यावर आलेला सदस्यांचा रोष शांत करण्यासाठी जि. प. बांधकाम उपविभाग देवळी येथील उपअभियंता कोठारी यांना पदभार दिला. यावर जि. प. बांधकाम सभापती गोपाळ कालोकर, जि. प. महिला बालकल्याण सभापती नंदकिशोर कंगाले यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. लोकप्रतिनिधीच्या आदेशांना सीईओंनी मानायलाच हवे असे मत व्यक्त केले. शिवाय शासकीय कामाकाज बंद असलेल्या दिवशी हा प्रकार झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.(प्रतिनिधी)
उपविभागीय अभियंत्याला दिला कार्यकारीचा प्रभार
By admin | Updated: September 8, 2014 01:30 IST