अन्न व औषधी प्रशासन : दुर्गादेवी मंडळांना दिल्या सूचनावर्धा : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दूर्गोत्सवानिमित्त मंडळांकडून प्रसाद, लंगर, भोजन वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यापुढे असे उपक्रम राबविण्यासाठी मंडळांना अन्न व औषधी प्रशासन विभागाचे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तत्सम सूचनाही संबंधित मंडळांना अन्न व औषधी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दूर्गादेवी उत्सवादरम्यान शहर आणि जिल्ह्यातील दूर्गा पूजा उत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था, पूजा संपन्न करणारी मंडळे अथवा तत्सम प्रकारच्या मंडळांकडून प्रसाद, लंगर वा भोजन वाटपासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांत आयोजकांकडून काही प्रमाणात दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न विषबाधेसारखी अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणारी दूर्गादेवी उत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था, पूजा संपन्न करणारी मंडळे अथवा तत्सम प्रकारच्या मंडळांना अन्न सुरक्षा व मानदे कार्यक्रमांतर्गत कलम ३१ (२) च्या तदतुदीनुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. सणांच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात खोवा, मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ यापासून तयार होणारे अन्न पदार्थ उपयोगात आणले जातात. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी जनतेच्या स्वास्थाच्या दृष्टीने लंगर वाटप करणाऱ्या आयोजक मंडळांसाठी मार्गदर्शक सूचनाही आखलेल्या आहेत. सर्व मंडळांना अन्नदान कार्यक्रमाच्या आयोजनासाठी या सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या असून नोंदणीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)अन्न शिजविताना आणि वाटप करताना घ्यावयाची काळजीप्रसाद तयार करताना स्वयंपाक तयार करण्याची जागा स्वच्छ, निटनेटकी व आरोग्यदायी असावी. प्रसाद तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक वा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावे. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, निटनेटकी व झाकण असलेली असावी. फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या परवाना, नोंदणीधारकांकडून करावी तसेच कच्चे, सडलेले वा खराब झालेल्या फळांचा वापर करू नये, प्रसादाचे उत्पादन करताना सदरचा प्रसाद मानवी सेवनास सुरक्षित राहील, याची खात्री करावी. आवश्यक तेवढ्याच प्रमाणात प्रसादाची निर्मिती करावी. प्रसाद बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य असल्याची खात्री करावी. प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकास अॅप्रॅन, ग्लोव्हज, टोपी आदी पुरविण्यात यावे. प्रत्येक वेळी त्या स्वयंसेवकाने हात स्वच्छ धुवावेत. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही त्वचा रोग व संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. प्रसाद तयार करण्याकरिता खवा, मावा यासारख्या नाशवंत अन्न पदार्थांचा वापर होत असल्यास विशेष काळजी घेण्यात यावी. दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील, असे विशेषत: ४ अंश सेल्सीयस अथवा त्यापेक्षा कमी तापमानावरच साठवणुकीस ठेवावेत. खवा, माव्याची वाहतूक व साठवणूक थंड, रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी. जुना, शिळा, अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठविलेला खवा, मावा प्रसादासाठी वापरला जाऊ नये. प्रसाद बनविणाऱ्या मंडळांनी प्रसादाची कच्च्या मालाचे खरेदी बिल, प्रसाद बनविणाऱ्या कॅटरर्स, स्वयंपाकी, स्वयंसेवक, प्रसाद वितरण करणाऱ्या स्वयंसेवकांचे नाव व संपूर्ण पत्ता आदीचा अभिलेख भरून अद्यावत करून ठेवावा. तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे व त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. या व्यतिरिक्त अन्न, प्रसाद याबाबत काही संशय असल्यास अन्न व औषध प्रशासन सुदामपुरी वर्धा या कार्यालयास संपर्क साधता येणार आहे. या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त जे.आर. वाणे यांनी केले आहे.
लंगरसाठी प्रमाणपत्राचे बंधन
By admin | Updated: September 25, 2016 02:10 IST