वर्धा : दरवर्षी शिक्षक दिनी शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल निवडक शिक्षकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. त्यानंतर त्यांना पूर्वी जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक आगावू वेतन वाढ व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन आगावू वेतनवाढी पुरस्कारापोटी दिल्या जायच्या. परंतू सहाव्या वेतन आयोगानंतर महाराष्ट्र शासनाने त्या देणे बंद केले. तेव्हापासुनच पूर्वी प्रमाणेच ह्या पुरस्कारानिमित्त दिल्या जाणाऱ्या आगावू वेतनवाढी देण्यात याव्या किंवा एक लक्ष रु. पुरस्कारापोटी रोख स्वरूपात दिले जावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शासनाकडे सातत्याने लावून धरली. ही मागणी शासनाच्या वतीने मान्य करण्यात आली आहे. १६ आॅगष्ट २०१४ ला शिक्षक संघाचे नेते आ. शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वात राज्य शिक्षण आयुक्त यांच्या कार्यालयासमोर १० हजार शिक्षकांच्या उपस्थितीत राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी ही एक मागणी होती. त्या आंदोलनात झालेल्या चर्चेमध्ये पुरस्कार प्राप्त (राज्य व राष्ट्रीय) शिक्षकांना ज्यादा वेतनवाढी ऐवजी एक लक्ष रोख पुरस्कारापोटी देण्याचे मान्य करण्यात आले होते व येत्या शिक्षक दिनापूर्वी शासनाचा जी. आर. काढला जाईल असे ठोस आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची पूर्ती करत महाराष्ट्र शासनाचे वित्त विभागाने अ नौ. सं.क्र ६०८/ व्यय-५ दि. ३ सप्टेंबर २०१४ अन्वये शासन निर्णय निर्गमित केला. यानुसार २०१४ पासून पुढे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एकदाच पुरस्काराची रक्कम एक लक्ष रोख मिळणार आहे. तसेच जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वीप्रमाणे एक ज्यादा वेतनवाढ किंवा अशाच प्रकारची रोख रक्कम शासनाने द्यावी यासाठी सुद्धा शासनाकडे मागणी सातत्याने करीत ते मिळविण्याचे जोरदार प्रयत्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ करीत आहे. शिक्षकांना दिलासा देणाऱ्या शासनाच्या या निर्णयाचे शे.सु. गायकवाड, जिलाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, कोषाध्यक्ष वसंत बोडखे, सरचिटणीस गजानन पुरी, कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, उपाध्यक्ष राजेश वालोकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता दाते, सचिव सुचिता वाघ, मनोहर नरसिंगकर, अरुण झोटींग, संजय हेपट, संजय नेहरोत्रा, कृष्णा देवकर, अनिल फुलमाली, संजय नहाते, दिनेश देशमुख, रमेश हाडके, सदानंद ठाकरे, साहेबराव राऊत, प्रकाश किटे, अनिल सरोदे, चंदू भुयार, प्रभाकर लोणकर, वासुदेव बिरे, संजय पारीसे, दिलीप पवार, दिलीप काळे, अनिल भुसारी, बंडू कोहाड, शिवाजी फुंदे, सुनिल कोल्हे, हनुमंत जगताप, अरुण बन्नगरे, विजय चौधरी, उल्हास शेळके, अजय भांडे यांच्यासह शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य व जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी स्वागत केले.(शहर प्रतिनिधी)
पुरस्कार प्राप्त शिक्षकांना एक लाख रुपये रोख मिळणार
By admin | Updated: September 9, 2014 00:34 IST