राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा नाही : पाठपुरावा करूनही शहिदांना लोटले जातेय दूरअमोल सोटे आष्टी (शहीद)देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेल्या लढ्यात आष्टीमध्ये सहा जणांना विरमरण आले. दहा जणांना फाशी तर शेकडो लोकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र आणि तेव्हाचे पोलीस ठाणे आजही उपेक्षित आहे. या केंद्राला आजही राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला नाही. गत अनेक वर्षांपासूनची ही मागणी धूळखात पडली आहे.आष्टीच्या क्रांतीदिनी हिंसाचार होऊन लंडनपर्यंत गाजला, हे सर्वश्रूत आहे. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेलेल्या या लढ्याची गाथा लोकशाहीप्रधान देशातील राज्यकर्त्यांना समजू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. विदर्भातील चिमूर-आष्टी येथील दोन्ही लढ्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. चिमूरचा विकास झपाट्याने झाला. ‘ब’ वर्ग पर्यटन जाहीर होऊन २० कोटी रुपयांची विकासकामे झाली; पण आष्टीला छदामही मिळाला नाही. सहा शहिदांना भडाग्नी दिलेल्या स्मृतीस्थळाचाही अद्याप विकास झालेला नाही.स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र असलेल्या वास्तूमधून सध्याचे हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय सुरू आहे. शासनाने विद्यालयाची इमारत बांधून द्यावी व स्वातंत्र्यलढ्याच्या केंद्राला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे. त्याचा विकास करावा. या मागणीसाठी हुतात्मा स्मारक समितीचे शिष्टमंडळ व स्वातंत्र्य संग्राम सैनिक तत्कालीन राष्ट्रपती प्रतीभा पाटील, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्वांना भेटले. सर्वांनी आश्वासने दिली; पण ती हवेतच विरली. यावर्षी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पालकमंत्री तथा वित्तमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार येणार आहेत. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील स्थळाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या मागणीला कितपत प्रतिसाद मिळतो, हे गुरूवारी स्पष्ट होणार आहे. शहिदांच्या नावाची शासन दरबारी उपेक्षा होत असल्याची खंत प्रत्येक आष्टीकर बोलून दाखवितो. शहिदांची भूमी असलेल्या आष्टीला गत ७३ वर्षांपासून उपेक्षितच ठेवण्यात आलेले आहेत. किमान यंदाचा श्रंद्धांजली दिन विशेष ठरावा आणि आष्टीच्या विकासाला चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.राष्ट्रीय स्मारक झाल्यास इतिहासाचे होणार जतन१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहा जणांना विरमरण आले. यात केशव डांगे, पंछी गोंड, डॉ. गोविंदराव मालपे, रशीद खान, वासुदेव सोनार, हिरालाल कहार यांचा समावेश आहे. ठाणेदार रामनाथ मिश्रालाही ठार केले. त्याच्या पत्नीच्या सहमतीने सहा जणांना भडाग्नी दिला. तेव्हा ठाणेदार मिश्रालाही त्यांच्यासोबत भडाग्नी दिला. यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील स्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
आष्टीचा ‘१९४२ स्वातंत्र्य लढा’ शासनदरबारी उपेक्षित
By admin | Updated: August 19, 2015 02:23 IST