तळेगाव (श्यामजीपत): येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित धोरणाचा त्रास तळेगाववासीय व परिसरातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. गावात कृत्रिम पाणीटंचाईचे चित्र आहे. गावात पाण्याची उपलब्धता असताना येथील महिलांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना २४ तास पाणी मिळावे म्हणून एका कंत्राटदाराला याबाबत कंत्राट दिले होते. तो करार गावकऱ्यांनी ग्रामसभेत धुडकावून लावला़ त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडून ही योजना सुरू करण्याबाबत टाळाटाळ होत आहे, असा आरोप ग्रामस्थांचा आहे. आठवड्यातून चार दिवस तर कधी दोनच दिवस नळाला पाणी सोडले आते. यातही नळ केवळ अर्धा तास़ येत असल्याने वापराकरिता पुरेसे पाणी मिळत नाही. जीवन प्राधिकरण तर्फे या भागात पाणी पुरवठा केला जातो. बसस्थानक परिसरातील रामदरा वॉर्ड क्र. १, ५ तसेच ६ येथील नागरिकांना नळाच्या पाण्यावर अवलंबुन रहावे लागते. या भागात विहिर नाही. यातच नळ अनियमित येत असल्याने उन्हाळ्याला सुरूवात होण्यापुर्वी पाण्याकरिता हाहाकार होत आहे. ग्रा.पं. प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी नळ कनेक्शन देण्याकरिता मिटर लावण्याचे कंत्राट दिले होते. यात कंत्राटदाराने नळ कनेक्शन न देता या भागातील सार्वजनिक नळाचे स्टँड पोल तोडले. ग्रामसभेत ग्रामस्थांनी आक्षेपानंतर याचे कंत्राट रद्द झाले. दोन महिन्यांपासून येथील नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असून कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काकडधरा वार्ड क्रमांक ५ व ६, रामदरा वॉर्ड क्र. १ येथील नागरिकांना पाणी विकत घेवून तहान भागवावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.(वार्ताहर)
कृत्रिम पाणीटंचाईने ग्रामस्थ हैराण
By admin | Updated: February 20, 2015 01:33 IST