वर्धा : चंदपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आल्याने येथे वर्धा मार्गे दारू पुरवठा होत असल्याचे अनेक कारवाईतून समोर आले आहे. यात सोमवारी रात्री जुनगढ येथे केलेल्या कारवाईत दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांसह त्यांना दारूसाठा देणाऱ्या नागपूर येथील दुकान मालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ५ लाख ३० हजार रुपयांची दारू व १० लाख रुपयांच्या महागड्या वाहनासह एकूण १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुमीत रमेश चिंतलवार (२६) रा. विश्वकर्मा नगर, नागपूर व विवेक सिताराम साखरे (२६) रा. आंबेडकर नगर, चामोर्शी, जि. गडचिरोली या दोघांना अटक करण्यात आली तर त्यांना दारूसाठा पुरविणारा सावंगी जि. नागपूर येथील दुकान मालक मुकेश जयस्वाल याच्यावर दारूबंदी काद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील सावंगी (आसोला) येथील दारूच्या दुकानातून दोन इसम पांढऱ्या रंगाच्या एमएच २१ सी ३७८५ क्रमांकाच्या वाहनाने समुद्रपूर मार्गे दारू आणत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून जूनगड येथे सापळा रचून माहितीतील वाहनाची झडती घेतली यात ५ लाख ३० हजार रुपयांची देशी दारू मिळून आली. तर १० लाख रुपयांचे वाहन असा एकूण १५ लाख ३२ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, सहायक पोलीस निरीक्षक ए.एम. जिट्टावार, अशोक साबळे, नामदेव किटे, राजू ठाकूर, वैभव कट्टोजवार, हरिदास काकड, दीपक जाधव, अमित शुक्ला, महेंद्र अढाऊ यांनी केली.(प्रतिनिधी)४नागपूर येथून चंद्रपूरला जाण्याकरिता असलेल्या महामार्ग क्रमांक ७ वर गत आठ दिवसात सुमारे सात कारवाया झाल्या आहेत. यात चंद्रपूर येथे जाणारा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
दारूची वाहतूक; गडचिरोली व नागपूर येथील दोघे अटकेत
By admin | Updated: August 12, 2015 02:28 IST