एका तपातील श्वापदांचा धुमाकूळ : २९ प्राण्यांचा अपघाती तर ११ प्राणी विहिरीत दगावलेप्रशांत हेलोंडे ल्ल वर्धाजंगलाशेजारी शेती असलेले शेतकरी नेहमी दहशतीत असतात. श्वापद कधी जनावरांवर हल्ले करतात तर कधी शेतात नासधूस करतात. जिल्ह्यात बारा वर्षांमध्ये ९३७ जनावरे वन्य प्राण्यांच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. या पोटी संबंधित शेतकरी व गोपालकांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.जिल्ह्याला ९२ हजार ६९२ हेक्टर एवढे विस्तीर्ण जंगल लाभलेले आहे. यात ४४ हजार ४६ हेक्टर राखीव, ३१ हजार ७२५ हेक्टर संरक्षित व १५ हजार ३४० हेक्टर झुडपी जंगल आहे. शिवाय खासगी व पर्यायी वनेही आहे. या जंगलांमध्ये असलेल्या श्वापदांकडून शेतकरी, शेतमजूर, पाळीव जनावरे आणि शेतीनाही नुकसान पोहोचते. या पोटी वन विभागाकडून शेतकऱ्यांना मदतही दिली जाते. पूर्वी ही मदत तोकडी होती. यात सुधारणा करण्याचे प्रयत्न विद्यमान वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री करीत आहेत. श्वापदांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांसाठी नुकसान भरपाईची रक्कम वाढविण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात गत बारा वर्षांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ९३७ जनावरे दगावली आहेत. या पोटी संबंधित शेतकरी, गोपालकांना वन विभागाद्वारे ४९ लाख २ हजार ८८९ रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यात सर्वाधिक १२३ जनावरे २०१४-१५ मध्ये श्वापदांच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. या वर्षात शेतकरी, गोपालक यांना ७ लाख ४३ हजार ६७५ रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. तत्पूर्वी २०१२-१३ मध्ये १०५ गुरे दगावली असून ५ लाख ६५ हजार ६५ रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. सर्वात कमी २८ जनावरे २००३-०४ मध्ये दगावली. या पोटी १ लाख १२ हजार १५० रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. २००२ ते २०१५ पर्यंतच्या काळात हिंस्त्र प्राण्यांनी ९३७ जनावरांना ठार केले. जिल्ह्यातील वनांतर्गत येणाऱ्या वर्धा, हिंगणी, खरांगणा, आर्वी, आष्टी, समुद्रपूर, कारंजा व तळेगाव (श्या.पं.) या आठ वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या या घटना घडल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता वन विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याची ओरड होत आहे. शिवाय नुकसान भरपाईही वेळेत मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करतात. असे असले तरी वन विभागाकडून मृत जनावरांची भरपाई म्हणून संपूर्ण दावे निकाली काढण्यात आले आहेत. नवीन अध्यादेश आल्याने शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. जंगलाशेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा हा निर्णय आहे. दहा वर्षांत ३ हजार ७५० हेक्टर पिकांचे नुकसान व १.३६ कोटींची भरपाई४जंगलाशेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या धुमाकूळाचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यात जनावरांवर हल्ल्यासह पिकांचे नुकसानही समाविष्ट असते. वर्धा जिल्ह्यात गत दहा वर्षांमध्ये शेतपिकांच्या नुकसानीच्या तब्बल ५ हजार २३ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये ३ हजार ७४९.९३ हेक्टर पिकांचे अतोनात नुकसान झाले. या सर्व प्रकरणांचा निपटारा वन विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. संबंधित शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी २००४ ते २०१५ पर्यंत एकूण १ कोटी, ३६ लाख २६ हजार ३१६ रुपये नुकसान भरपाई प्रदान करण्यात आली आहे. नुकसान करणाऱ्या प्राण्यांमध्ये केवळ निलगाईमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचेही वन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे. यात २०१४-१५ पिकांची नासधूस केल्याची सर्वाधिक १२३० घटना घडल्या आहेत. यात ८३०.५ हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून ५६ लाख १२ हजार ८३३ रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. विहिरीत पडून ११ प्राण्यांचा मृत्यू४शेतशिवारात वा गावांतील विहिरीत पडूनही वन्य प्राण्यांचा मृत्यू होता. जिल्ह्यात पाच वर्षांत अकरा प्राण्यांचा मृत्यू झाला. यात ढगा भूवन येथे बिबट, वर्धा व वेळा येथे चितळ, मौजा सोंडी येथे अस्वल तर बोरी कोकाटे येथे दोन सांबरांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचेही वन विभागाने अहवालात नमूद केले आहे.रस्ता अपघातात पाच वर्षांत २९ प्राण्यांचा मृत्यू४जिल्ह्यातील ९२ हजार हेक्टरमध्ये पसरलेले विस्तीर्ण जंगल मुख्य मार्गाच्या दुतर्फा आहे. यामुळे रस्त्यांवरही वन्य प्राण्यांचा संचार आढळून येतो. यात अनेकदा वाहनांच्या धडकेत वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. जिल्ह्यात पाच वर्षांमध्ये तब्बल २९ वन्य प्राण्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक निलगायींचा समावेश असल्याचे वनविभागाने नमूद केले आहे. १८ जून २०१० रोजी सारंगपुरी ते आष्टी मार्गावर चितळाचा मृत्यू झाला. ७ जानेवारी २०११ मध्ये नागपूर ते तळेगाव दरम्यान वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. २५ डिसेंबर २०१२ व २० सप्टेंबर २०१४ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. सातवर वाहनाच्या धडकेत भेकडी या प्राण्याचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. एका निलगायीचा १३ जानेवारी २०१५ रोजी रेल्वेच्या धडकेनेही मृत्यू झाल्याचे नमूद आहे.
९३७ जनावरांसाठी दिले ५० लाख
By admin | Updated: July 27, 2015 02:31 IST