वर्धा : जिल्ह्यातील अधिकारी हे कायदे गुंंडाळून मनमानीपणे वागत असल्याच्या प्रत्यय विविध कामातून येतो. नागरिकांना याचा वेळोवेळी प्रत्यय असून याविरोधात कुठे तक्रार करावी हा प्रश्न आहे. वर्ध्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी अत्यंत चुकीचे शाळा संच निर्धारण करून जिल्ह्यातील शाळांची शिक्षक संख्या कमी केली. याचा फटका परिविक्षा सहा महिन्यांनी संपणार असलेल्या ५०० शिक्षण सेवक शिक्षकांना बसला असून त्यांना न्याय देण्याकरिता शासनाने पावले उचलावी आणी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आहे. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी नवीन सोना यांना महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळालेला आहे. या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शासन निर्णय आणि नियम बासनात गुंडाळून ठेवत अधिकारी निर्णय घेतात. याचा प्रत्यय शिक्षण सेवकांना आला. अडीच वर्षे नोकरी केलेल्या व चुकीचे संच निर्धारण करून अतिरिक्त ठरविलेल्या या ५०० शिक्षकांना तात्काळ नोकरीतून काढून टाका असा तगादा शिक्षणाधिकारी यांनी चालविलेला आहे. हा शिक्षकांवरील अन्याय आहे. या अन्यायविरोधात शिक्षकांना सोबत घेवून कायद्याप्रमाणेच त्यांना न्याय मिळाला पाहिजे. शासन निर्णयाप्रमाणेच शाळांचे काटेकोरपणे संचनिर्धारण व्हावे म्हणून लोकशाही दिनात शिक्षणाधिकारी वर्धा व मुख्य कार्यपालन अधिकारी चौधरी यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. या अन्यायग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी शासनाने लक्ष देऊन त्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. लोकशाही दिनात जिल्हाधिकारी यांना तक्रार व निवेदन देताना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा संघटक विनय डहाके, प्रदिप महल्ले, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सतिश जगताप, लक्ष्मीकांत सोनवणे, विजय मुळे, प्राचार्य भगत, मिलींद मुडे, मनोहर बारस्कर, विनोद राऊत, योगेश्वर कलोडे, रामदास निम्रट, राजु सातपूते यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, अन्यायग्रस्त शिक्षण सेवक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
५०० शिक्षण सेवक नोकरीला मुकणार
By admin | Updated: September 1, 2014 23:49 IST