वर्धा : कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम येथील कन्नमवार शाळेच्या प्रांगणावर शनिवारी विदर्भस्तरीय गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून एकूण ३१६ गवळाऊ जनावरे यात सहभागी झाले होते. यावेळी सर्वोत्कृष्ट जनावरांच्या मालकांना पारितोषिक देण्यात आले. या प्रदर्शनाच्या उद्घाटकीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चित्रा रणनवरे यांची उपस्थिती होती. मंचावर समाज कल्याण सभापती वसंता पाचोडे, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती श्यामलता अग्रवाल, महिला व बालकल्याण समिती सभापती चेतना मानमोडे, कारंजा पंचायत समिती सभापती मोरेश्वर भांगे, जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र रणनवरे, मारोतराव व्यवहारे, गोपाळ कालोकर, गजानन गावंडे, मोरेश्वर खोडके, मनोज चांदूरकर, कन्नमवारचे सरपंच अजय दिग्रसे, कारंजा पंचायत समिती सदस्य तेजराव बन्नगरे, पंचायत समिती उपसभापती शुभांगी पठाडे, भलावी, गजभिये, कन्नमवार विद्यालयाचे आर.व्ही. वसू, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सतीश राजू, नागपूरच्या मापसूचे संचालक डॉ. नंदकिशोर झाडे, पिपल्स फॉर अॅनिमलचे आशिष गोस्वामी आदींची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना रणनवरे म्हणाल्या, गवळाऊ प्रजातीचे संवर्धन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. ती वर्धा जिल्ह्याची देण आहे. पुरातन काळापासून गवळाऊ गायींचा इतिहास जिल्ह्याला लाभलेला आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे. याकरिता शासनस्तरावरही प्रयत्न करण्यात येत असून शेतकरी, गोपालकांनी यामध्ये पुढाकार घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपस्थित सदस्यांनी विचार व्यक्त केले. प्रारंभी टाकरखेडे येथील लहानूजी महाराज या संस्थेच्या गायीचे पुजन चित्रा रणनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविकातून डॉ. राजू यांनी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे संचालन शिरास, डॉ. अनिल ठाकरे यांनी केले तर आभार डॉ. मांडेकर यांनी मानले.(प्रतिनिधी)आर्वीतील अक्षय अजमिरे यांचा वळू चॅम्पियनचार विभागात असलेल्या या स्पर्धेत गट अ मध्ये गवळाऊ वळूंमधून आर्वी तालुक्यातील रोहणा येथील अक्षय अजमिरे यांचा वळू प्रथम आला. त्यांना चॅम्पियन आॅफ चॅम्पियनने सन्मानित करण्यात आले. त्यांना फेटा, चषक, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. याच गटातून द्वितीय क्रमांक गणपत निकोसे तर तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर उईके यांना प्राप्त झाला. गट ब गटामध्ये सर्वोत्तम गाय सुधाकर हिंगणे यांची ठरली. गवळाऊ गायी या गटातून द्वितीय क्रमांक राजू लाड तर तृतीय क्रमांक यशवंत उमाटे यांना प्राप्त झाला. क गटामधून कालवडीमध्ये शंकर अहाके, नितीन निकोसे, गुणवंत घंगाळ तर गट ड गवळाऊ वासरांधमून धनराज बारंगे, कुणाल पराळे आणि दादाराव अरबट यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाले. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गवळाऊ जनावरांच्या प्रदर्शनात ३१६ पशुंचा सहभाग
By admin | Updated: March 2, 2015 00:13 IST