ठाणे : स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर जास्त नव्हे, तर स्मार्ट अभ्यास करणे आवश्यक आहे, असा सल्ला नवी मुंबई पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांना दिला.विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील नवरंग महोत्सवात प्रमुख पाहुणे ते बोलत होते. अभ्यास किती केला, किती वेळा केला, कोणती पुस्तके वाचली, किती वाचली याचा आणि यशाचा काहीही संबंध नसतो. स्पर्धा परीक्षांत यश प्राप्त करायचे असेल, तर जास्तीतजास्त गुण मिळवणे हे ध्येय असले पाहिजे. बेस्ट गुण मिळवण्यासाठी बेस्ट उत्तरे लिहिण्याकडे कल असला पाहिजे. उत्तर पूर्ण आणि ते योग्य असणे यालाच बेस्ट उत्तर म्हणतात. उत्तराचेही भाग असतात, हेच माहीत नसते. उत्तराचे जितके भाग असतात, तितकेच गुण मिळत असतात. अभ्यासक्रम वाचून अभ्यास करण्यापेक्षा प्रश्नांचा अभ्यास करा आणि त्या अनुषंगाने उत्तरे वाचा आणि लिहा. यामुळे परीक्षा तंत्र आणि उत्तरे लिहिण्याची पद्धत समजेल. स्पर्धा परीक्षा म्हणजे ज्ञानाची परीक्षा नसते, तर तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या आधारे काय करता येईल, हे विचारलेले असते. प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगळे असते. दर दोन ते चार वर्षांनी स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न बदलतो. जे वाचता त्यावर विचार करून उत्तरे लिहावी. हे तंत्र वापरल्यास यश नक्कीच मिळेल. समर्पण आणि एकाग्रतेने काम केल्यास कमी वेळेत जास्त यश मिळते. तुमचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हे तुम्ही स्वत:च असले पाहिजे. तुमच्यात स्वत:ला शोधा. स्वत:चे चांगले आणि वाईट गुण समजून घ्या आणि त्यानंतर वाईट गुण कमी करून चांगले गुण वाढवा. हुशारी ही ज्ञानावर नव्हे, तर तुमच्या वागण्यावरून आपोआप समजते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आनंदाने जगा. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी भूषवले. (प्रतिनिधी)विद्यार्थी-प्राध्यापकांवर केली प्रश्नांची सरबत्ती परीक्षेत गुण मिळवण्यासाठी काय करावे? अभ्यास करण्याची पद्धत एक असेल तर टक्के मात्र कमीजास्त का मिळतात, बेस्ट गुण मिळवण्यासाठी परीक्षेत कोणते तंत्र वापरणार, बेस्ट उत्तर म्हणजे काय, उत्तरांचे भाग किती, प्रस्तावना आणि निष्कर्ष यातला फरक काय, असे एक ना अनेक प्रश्न आयुक्त मुंढे यांनी विद्यार्थ्यांबरोबर प्राध्यापकांनाही विचारले. विद्यार्थी- प्राध्यापकांनी उत्तरे दिल्यावर त्यांचे प्रश्नांवर प्रश्न सुरू होते. मुंढेच्या प्रश्नांचा वर्षाव बराच वेळ सुरू होता. मुलांनीही नंतर त्यांना प्रश्न विचारून शंकानिरसन करून घेतले. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली.
स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक स्मार्ट अभ्यास
By admin | Updated: December 25, 2016 04:34 IST