हितेन नाईक / पालघरसोमवारच्या सुटीमुळे मंगळवारी मोठ्या प्रमाणात जिल्हा बँकासमोर रांगा लाऊन उभ्या असलेल्या खातेदारांना आज सकाळी टीडीसी बँकेला जुन्या नोटा स्वीकारता अथवा बदलून देता येणार नाही हा रिझर्व्ह बँकेचा फतव कळताच ते प्रक्षुब्ध झाले. महतप्रयासाने त्यांना शांत करावे लागले. या फतव्यामुळे पतसंस्था, सहकारी बँका, सोसायट्या, मच्छीमारी संस्था, बचतगट यांच्या अर्थकारणाचा कणाच मोडून पडला आहे. पालघर या आदिवासी जिल्ह्यात टीडीसी हीच प्रमुख बँक आहे. तिच्या शाखेसमोर पैसे भरणे, बदलून घेणे आणि काढण्यासाठी आज पहाटे ५ पासून रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना आरबीआयच्या आदेशाने जुन्या नोटा भरता येणार नसल्याचे कळल्या नंतर नवापूर, सातपाटी येथील शाखेतील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवळले.किनारपट्टीवर राहून आपला मच्छिमारी व्यवसाय करणारे मच्छिमार, त्यांच्या सहकारी संस्था आपले उत्पन्न, उलाढाल अनेक वर्षा पासून या बँकेतच जमा करीत आले आहेत. सातपाटी हे एक महत्त्वपूर्ण मच्छीमारी बंदर असल्याने सुमारे २०० ते ३०० लहान मोठ्या बोटीद्वारे मच्छीमारी व्यवसाय केला जातो. एका बोटीला वर्षा काठी १० ते १२ लाखाचे उत्पन्न होत असले तरी या मासे विक्र ीचा व्यवहार सहकारी संस्था मार्फत ठाणे जिल्हा बँकेद्वारे केला जातो. या बँकेकडून मच्छिमार संस्थांना वर्षाकाठी ४.५ कोटीचे कर्ज पावसाळी हंगामा नंतर सुरु होणाऱ्या मच्छीमारी व्यवसायासाठी दिले जाते. तसेच बँकेत गावातून ८.५ कोटीचे कर्ज सोन्याच्या तारणा वर देण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर ला जुन्या नोटा जमा करण्याचे आदेश झाल्या पासून सातपाटी गावातील सुमारे १६ हजार ग्राहका कडून सुमारे ३.५ कोटी रुपयांच्या ५००, १००० च्या जुन्या नोटा जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांची आर्थिक नाडी या बँकेकडे आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सातपाटी शाखेत १६ हजार ग्राहक असून सहकारी संस्था, पतपेढ्यांची ३० खाती आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाची आर्थिक उलाढाल या बँकेतूनच चालते. आपल्या मच्छीमारी व्यवसायासाठी डिझेल, बर्फ, जाळी, पगार ई. साठी नेहमीच जवळ रोख रक्कम ठेवणे आवश्यक असल्याने त्या बदलण्यासाठी अथवा जमा करण्यासाठी ठाणे जिल्हा बँके समोर मागील ११ नोव्हेंबर पासून गर्दी जमत होती.नवापूरच्या शाखेत वैतागलेल्या ग्राहकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले होते. बहुतांशी ग्राहकांचे ठाणे जिल्हा बँके व्यतिरिक्त अन्य कुठल्याही बँकेत खाते नसल्याने जवळ जमा असलेली रक्कम बदलायची कशी? असा प्रश्न लोकांना सतावत आहे. तर आपल्यापासून ग्राहक तुटला जाईल आणि बँकेची उलाढाल रोडावेल या भीतीने बँकेचे संचालक हादरले आहेत. या संदर्भात बँकेच्या उपाध्यक्षा सुनीता दिनकर यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी सांगितले की, यावर तोडगा काढण्यासाठी ठाणे येथे संचालकांची बैठक झाली. ती मध्ये रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचा या वेळी निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत आता मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात येणार असल्याचे समजते. याबाबत काही कारवाई व्हायची तेव्हा होईल परंतु तोपर्यंत ठेवीदारांचा जीव मात्र टांगणीलाच राहील.
जिल्हा बँकेवरील निर्बंधाने व्यवहार ठप्प!
By admin | Updated: November 16, 2016 04:15 IST