कल्याण : पश्चिमेतील अन्सारी चौकात असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सौलेह मोहम्मद दवाखान्यात २००२ पासून केवळ लसीकरणाची सुविधा पुरविला जात आहे. या दवाखान्यात आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी मुस्लीम समाजिक संस्थांनी मंगळवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे केली आहे. या वेळी विविध सूचना या संस्थांनी महापौरांकडे मांडल्या. त्याचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले आहे. मोहम्मद दवाखान्याची बाब फैजान मौलवी यांनी निदर्शनास आणून दिली. त्यासंदर्भात मौलवी, माजी उपमहापौर जावेद जवणे, अपक्ष नगरसेवक काशिफ तानकी, फव्वाद बुबेरे, सिराज शेख तसेच ‘अल खैर’ या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी फरीद खान, ‘उमंग’ सामाजिक संस्थेचे अब्दुल गफ्फार शेख यांनी मंगळवारी देवळेकर यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन दिले. या वेळी सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांना या वेळी पाचारण करण्यात आले. मोहम्मद दवाखाना सुसज्ज होता. तेथे वरच्या मजल्यावर रुग्णांसाठी १८ खाटा तसेच प्रसुतीची सोय होती. मात्र, आता या दवाखान्याची दूरवस्था झाली आहे. महापालिका केवळ लसीकरणाची सुविधा पुरवते. त्यामुळे मुस्लिम मोहल्ल्यातील महिलांना महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घ्यावी लागते. रविवारी दवाखाना बंद असतो. तर अन्य दिवसी तो केवळ दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असतो. २००२ पूर्वी या दवाखान्यात ज्या सुविधा पुरवल्या जात होत्या, त्या पुन्हा पुरवाव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली. देवळेकर यांनी सांगितले की, महापालिकेने डॉक्टरभरतीसाठी अर्ज मागविले होते. ८० पदांसाठी केवळ २० डॉक्टरांचा प्रतिसाद मिळाला आहे. डॉक्टरांचा कल खाजगी रुग्णालयात काम करण्याकडे असतो. सरकारी रुग्णालयांत काम करण्याबाबत त्यांच्यामध्ये अनास्था असते. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा आहे. त्यामुळे दवाखाना सुरूकरणे तूर्तास तरी शक्य नाही. आउट सोर्सिंग करून डॉक्टर भरतीचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. तो मंजूर झाल्यावर महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर व त्यांच्याशी निगडीत स्टाफची भरती केली जाईल. रोडे यांनी सांगितले की, ‘या दवाखान्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पाठविला आहे. त्याची दुरुस्ती केल्यावर दवाखाना योग्य सोयी-सुविधांसह चालविणे शक्य होईल. प्रसुतीगृह चालविण्यासाठी प्रसुती तज्ज्ञाची आवश्यकता आहे. महापालिकेकडे सध्या दोनच प्रसुती तज्ज्ञ आहेत. त्यामुळे या दवाखान्यात डॉक्टरांअभावी प्रसुतीगृह पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असे स्पष्ट केले. १९९१ पासून मंजूर असलेली वैद्यकीय पदे आहेत. त्यानंतर रिक्त झालेली पदेच भरली गेली नसल्याने डॉक्टर उपलब्ध नाहीत.’‘अल खैर’ संस्थेच्या खान यांनी, डॉक्टर आमच्या सामाजिक संस्थेकडून पुरविले गेल्यास सरकारी दवागोळ््या व इतर सुविधा पुरविल्या जातील का, प्रश्न विचारला. त्यावर आरोग्य संचालकांना विचारावे लागेल, असे रोडे यांनी सांगितले. बुबेरे यांनी फोर्टीज रुग्णालयाशेजारी वाहनतळासाठी जागा आरक्षित आहे. महापालिकेने ही जागा प्रसुती रुग्णालयासाठी दिल्यास तेथे रुग्णालय उभारण्यासाठी समाज पुढाकार घेईल. केवळ मुस्लिम समाजासाठीच नव्हे तर इतर सर्व धर्मीय व समाजातील महिलांसाठी हे प्रसुतीगृह असेल, अशी तयारी बुबेरे यांनी दर्शविली आहे. त्यावरही विचार नक्कीच करू, असे आश्वासन महापौरांनी दिले. (प्रतिनिधी)
मोहम्मद दवाखान्यात सर्व सुविधा द्या!
By admin | Updated: January 25, 2017 04:40 IST