शौकत शेख, डहाणूडहाणू बंदर पंधरा आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी सज्ज झाले आहे.मात्र पर्ससीन नेट पद्धतीमुळे पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छिमार कर्जबाजारी होत चालला असून शासनाने याकडे गांभीर्याने विचार न केल्यास मच्छिमारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार आहे. अशा स्पष्ट इशारा मच्छिमारांच्या बैठकीत ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार संघाचे अध्यक्ष अशोक अंभिरे यांनी दिला आहे.मुंबईपासून १२० किमी अंतरावर डहाणू हे जिल्ह्यातील अग्रेसर व नावाजलेले बंदर आहे. चिंचणीपासून वरोर, गुंगवाडा, वडियाले, धा. डहाणू, डहाणू ते झाईपर्यंत एकूण सहाशे लहान मोठ्या बोटी आहेत. येथील समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी बांधवांचा मासेमारी हाच एकमेव व्यवसाय असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा आधार आहे.सागराशी रात्रंदिवस झुंज देवून मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या मासळीची डहाणू बंदरात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते. मुंबई, शिवडी कोल्हापूर, सातारा तसेच इतर राज्यात सुकी मासळी डहाणू बंदरातूनच नेली जाते. मात्र तरीही या भागाचा विकास ज्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, त्याप्रमाणे अजूनही झालेला नाही. तेथील अनेक मच्छिमार सोसायटीचा वार्षिक अहवाल पाहता मोठ्या प्रमाणावर दर घसरण झाल्याचे चित्र दिसून येते. त्याचे मुख्य कारण म्हणजे खोल समुद्रात पर्ससीन नेटसारख्या विनाशकारी पद्धती व अनियंत्रित मासेमारीमुळे मत्स्य दुष्काळाचे सावट पसरले आहे.दरम्यान, मासेमारी ही एकप्रकारे समुद्रातील शेतीच आहे. शेती व मासेमारी पूर्णत: निसर्गावरच अवलंबून आहे. ज्याप्रमाणे शेतीमालाला शासनाकडून हमी भाव दिला जातो तसेच राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्यास शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्याचे पुनर्वसन केले जाते. मत्स्यव्यवसायाचे अशाप्रकारे नुकसान झाल्यास मच्छिमारांना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मच्छिमार कर्जबाजारी होत असून शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनाही आत्महत्या करण्याची वेळ आलेली असून याकडे लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया येथील मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष व मच्छिमार नेते अशोक अंभिरे यांनी व्यक्त केली.
डहाणू बंदर मासेमारीसाठी सज्ज
By admin | Updated: August 15, 2014 01:38 IST