भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा दिवसांपूर्वी सवाद येथे जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाले. मात्र या रुग्णालयासाठी मनुष्यबळ लागणार असून महिन्याचा खर्चही कोटीच्या घरात जाणारा आहे. कमी वेतनामुळे आवश्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मिळत नसल्याने ते अद्याप सुरु झालेले नाही. यामुळे रुग्णांमध्ये चिंता पसरली आहे. दरम्यान, सोमवारपासून रुग्णालयात चार डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णालय सुरु झाले तरी एकही रुग्ण दाखल झालेला नाही अशी प्रतिक्रिया प्रांताधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली.दोन लाख चौरस फुटांच्या या रुग्णालयात ८१८ बेड आहे. या कोविड रुग्णालयाचा फायदा भिवंडी, शहापूरसह कल्याण, मुरबाड या तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांबरोबरच शहरी भागातील रुग्णांनाही होणार असल्याची ग्वाही खुद्द जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी दिली होती. मात्र उदघाट्नानंतरही रुग्णालय सुरु झाले नसल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रुग्णालय बंद असल्याने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने रुग्णालय सुरु केले. रुग्णालयात ३६० महिला, ३७९ पुरुषांसाठी ऑक्सिजन बेड असून ८८ अतिदक्षता बेड, ज्यात २० व्हेंटिलेटर, २० बायपॅक व ४० हायफ्लो नेझल कॅनॉल सुविधा असलेले एकूण ८१८ बेड आहेत.प्रशासनाने तातडीने योग्य ते मनुष्यबळ पुरवून रुग्णालय सुरु करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हे रुग्णालय सुरु झाल्यास रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागणार नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हे रुग्णालय सुरु करण्यासाठी हालचाली सुरु करा अशी मागणी केली जात आहे.
CoronaVirus News: जिल्हा कोविड रुग्णालय उद्घाटनानंतरही बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:01 IST