लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने वरसावे नाका, घोडबंदर मार्गावरील ‘एक्स्प्रेस इन’ हे मोठे हॉटेल कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सील केले असताना आता त्याला लागून असलेले ‘फाउंटन’ हे मोठे हॉटेलही पालिकेने सील केले आहे. ‘फाउंटन’मध्ये पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ८ मार्चपर्यंत हे हॉटेल सील केले आहे.
नेहमीच वर्दळीचा आणि महाराष्ट्रच नव्हे तर अन्य विविध राज्यांतील लोकांचा खानपान व राहण्यासाठी नेहमीच वरसावे नाका, घोडबंदर मार्ग व काशिमीरा महामार्गावरील हॉटेल-बार व लॉजमध्ये राबता असतो. त्यामुळे कोरोना संसर्ग व्यापकपणे पसरण्याचा मोठा धोका या परिसरातील आस्थापनांमधून व्यक्त होत होता. पालिकेने येथील एक्स्प्रेस इन हॉटेलमध्ये सुरुवातीला २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ॲण्टीजेन चाचणीत आढळले होते. त्यामुळे हे हॉटेल १८ फेब्रुवारीपासून ४ मार्चपर्यंत सील केले. तर, आरटीपीसीआर चाचणी अहवालातही ‘एक्स्प्रेस इन’मधील आणखी आठ कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, महापालिकेने या भागातील हॉटेल आदी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली असता त्यात ‘फाउंटन’ हॉटेलमधील पाच कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेने हे हॉटेलही ८ मार्चपर्यंत सील केले आहे, असे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी सांगितले.
----------------