ठाणे : जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना राबवण्यात येत आहे. मात्र, या योजनेत नवीन कामांचा समावेश न करता महात्मा गांधी म्हणजे ‘मनरेगा’च्या ११ कामांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. या कामांव्दारे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचा मानस ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त केला. येथील एनकेटी सभागृहात मंगळवारी समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची कार्यशाळा आयोजिली असता तिच्या उद्घाटनाप्रसंगी भीमनवार बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे.पावसाळा सुरु होण्यापूर्वी मनरेगाची कामे झपाट्याने करण्याचा मानस व्यक्त करून जिओ टॅगिंग किंवा आधार संलग्नता अशा तंत्रज्ञानातून रोहयोची कामे अधिक परिणामकारक करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करते वेळी स्पष्ट केले. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत मनरेगाच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाची ११ कामे प्रामुख्याने हाती घेण्यात आली आहेत. यातअहिल्यादेवी सिंचन विहिरीची ५०० कामे करण्यात येणार आहेत. अमृतकुंड शेततळे एक हजार २००, भू संजीवनी व्हर्मी कंपोस्टचे ५११, भू संजीवनी नाडेप कंपोस्टचे ४५०, कल्पवृक्ष- फळबागचे १२११ हेक्टरमध्ये लागवड, निर्मल शौचालये २३०० हेक्टरमध्ये, शोषखड्डे ४५०, अंकुर रोपवाटिकांमध्ये १६ लाख रोपे, समृद्ध गाव तलाव ४००, तर एक लाख ६० हजार वृक्ष लागवड आणि ग्राम सबलीकरणाची १८०० कामे या समृध्द करण्यात येणार आहेत. दोन टप्यात पार पडलेल्या या कार्यशाळेत रोहयोचे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे, कैलास मोरे, सनी धात्रक आदी रोहयोविषयक तज्ञ व्याख्यात्यांनी यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले. यावेळी २०१६- १७ च्या कामांचा आढावा देखील घेण्यात आला. शासनाने दिलेल्या उद्दीष्टापेक्षा १५४ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शासनाने तीन लाख मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, त्यापेक्षा अधिक म्हणजे चार लाख ६३ हजार १०४ मनुष्य दिन निर्मिती करण्यात आली. (प्रतिनिधी)
मनरेगाच्या ११ कामांचा समावेश
By admin | Updated: April 20, 2017 04:04 IST