शिवाजी गोरे - दापोली -अपंगत्त्वावर मात करत मंगेश महाडिक व मनीषा महाडिक या अपंग दाम्पत्याने काजू प्रक्रिया लघु उद्योगातून स्वत:च्या उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. आपण अपंग असलो तरीही रडत-कुढत न बसता सर्वसामान्यांसारखे जीवन जगावे, या जिद्दीने त्यांची धडपड सुरु होती. काहीतरी करायला पाहिजे, अशी खूणगाठ मनाशी बांधून काजू प्रक्रिया लघुउद्योग सुुरु केला. त्यासाठी पैसे नव्हते. पै-पै गोळा करुन व पत्नीचे दागिने विकून प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या मशिन्स घेतल्या. परंतु लघु उद्योगासाठी जागा नसल्याने हा उद्योग जनावरांच्या गोठ्यात सुरु आहे. विशेष म्हणजे या अपंग दाम्पत्याने अनेक बेरोजगारांना रोजगाराचा हात दिला आहे.मंगेश महाडिक यांचे जन्मापासून दोन्ही पाय अपंग आहेत. मात्र, आपण अपंग असल्याचे त्यांना मान्य नाही. आपण शरीराने अपंग असलो तरीही मनाने सुदृढ आहोत. त्यामुळे अपंग - अपंग म्हणत रडत-कुढत जीवन जगण्यापेक्षा स्वावलंबी जीवन जगण्यात महाडिक यांना बालवयापासूनच अधिक रस होता. गावातील चौथीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर मंगेश् महाडिक यांनी पुढील शिक्षण सोडले. कुटुंबातील व्यक्तींवर ओझे बनून राहण्यापेक्षा स्वत:च्या हिमतीवर काहीतरी करण्याची जिद्द बाळगून त्यांनी मुंबई गाठली. मुंंबईत काही वर्षे नोकरीही केली. परंतु अपंग व्यक्तीला होणारा त्रास त्यांनासुद्धा सहन करावा लागला. बाहेरुन परीक्षा देऊन दहावीपर्यंत शिक्षण घेतले.पत्नी मनीषाची खंबीर साथ लाभल्याने मंगेश यांना अधिक बळ मिळाले. मनीषा महाडिक यांचे माहेर आडीवाडी चिखलगावात दहावीपर्यंत शिक्षण झाले. लग्न झाल्यानंतर अपंग असलो तरीही काही तरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. दोघेही पायाने अपंग असल्यामुळे हाताने करता येणाऱ्या उद्योगाच्या शोधात होते. परंतु उद्योगासाठी लागणारे भागभांडवल नाही. प्रशिक्षण नाही, जागा नाही, अशा परिस्थितीत लघु उद्योग करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. दोघांनी खूप कष्ट करुन पै-पै गोळा करायला सुरुवात केली. जिद्दीने कष्ट करुन काजू प्रक्रिया उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणाऱ्या २ लाख रुपयांच्या मशिन्स विकत घेतल्या. मात्र, उद्योगासाठी जागा नव्हती. त्यामुळे जनावरांच्या गोठ्याचा आधार घेण्यात आला. जनावरांच्या गोठ्यातील कातळ तोडून हा लघुउद्योग सुरु झाला. स्वत:च्या उदरनिर्वाहाबरोबरच गावातील १२ महिलांना गावातच रोजगार निर्माण झाला. आज महाडिक दाम्पत्याचा सुखी संसार सुरु आहे.दिवसातील १२ ते १४ तास हे महाडिक दाम्पत्य काम करत आहे. पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ९ ते १० वाजेपर्यंत सतत काम करण्याची ऊर्जा त्यांच्यात आहे. पहाटे चार वाजता मंगेश महाडिक कामाला लागतात. ९ वाजता कामगार येण्याआधी २० किलो काजू बी फोडून तयार ठेवतात. दिवसाला ५० ते ६० किलो बी फोडण्याची त्यांची क्षमता आहे. काजू बी फोडण्यापासून ते काजूचे मार्के टिंग करण्यापर्यंतची सर्व कामे ते स्वत: करतात. काजूबिया खरेदीसाठी लागणारे भांडवल नसल्याने ते शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. काजू प्रक्रिया उद्योगातून १२ महिलांना रोजगार दिला आहे. शासनाने आपल्याला लघु उद्योगासाठी जागा दिल्यास आंजर्ले गावात १०० लोकांना रोजगार नक्कीच उपलब्ध देईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अनेक अपंग बांधव केवळ शरीराने अपंग असून, मनाने सुदृढ आहेत. परंतु त्यांना सरकारच्या आर्थिक पाठबळाची व योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. अपंगांप्रती समाज व सरकारची असलेली मानसिकता बदलायला हवी. सरकारने अपंग बांधवांना लघु उद्योगासाठी मदत केल्यास अनेक अपंग बांधव स्वावलंबी जीवन जगतील. मात्र, त्यासाठी समाज व सरकारचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.- मंगेश महाडिक, काजू प्रक्रिया उद्योजक, आंजर्लेअपंगत्त्वावर मात करुन आम्ही मोठ्या कष्टाने काजू युनिट सुरु केले आहे. आता या उद्योगामुळे आमचा संसार सुखी झाला आहे. इतरही अपंग बांधवांचा संसार सुखी व्हावा.- मनीषा महाडिक, लघु उद्योजकाची पत्नी.आघाडी सरकारमार्फत अपंगांच्या सुविधा आमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत. आता भाजपा सरकार आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आयेंगे असे सांगितल्याने आमच्यासाठी चांगले दिवस येतील, असे वाटत होते. परंतु अजूनही चांगले दिवस आले नाहीत. आम्ही चांगल्या दिवसाची वाट पाहतोय.- अनिल रघुवीर, अपंगअपंगांना सरकारकडून सुविधा मिळत नाहीत. अपंगांना स्वत:च्या नैसर्गिक विधीसाठीसुध्दा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सरकारने अपंग बांधवांना मिळणारी तुटपुंजी मदत तरी वाढवून द्यावी.- परशु पावसे, पाजपंढरी
जिद्दीचे पंख लाभलेल्या अपंग जोडप्यानेच दिला अनेकांना रोजगार
By admin | Updated: December 2, 2014 23:31 IST