दापोली : ‘कोकणात सहकार रूजला नाही व रूजत नाही, असे सहकारातील तज्ज्ञांचे मत आहे. कोकणात सहकार रूजला असता तर कोकणातील शेतकऱ्यांची परिस्थिती घाटावरच्या शेतकऱ्यांसारखी झाली असती. बरं झालं कोकणात सहकार रूजला नाही’, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी दापोली येथे केले. बँकेची दापोली शाखा स्वमालकीच्या जागेत स्थलांतरीत झाली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, कोकणातील शेतकरी व्यवहारज्ञानी आहे. आपल्याला किती पैशांची गरज आहे व आपण ते वेळेत परत करू शकू की नाही ते त्याला चांगले ठावूक असते. हे परत देण्याची मानसिकता असल्याने येथील शेतकरी त्याला हवे तेवढेच कर्ज घेतो व ते वेळेत परत करतो. मात्र, ही प्रामाणिक मानसिकता कोकणवगळता इतर प्रांतात आढळून येत नाही. त्यामुळे येथे सहकार रूजला नाही ते एका अर्थाने बरेच झाले. विकासकामांबाबतही कोकण व इतर प्रांतातील मानसिकतेत जमीन - आस्मानाचा फरक आहे. कोकणातील विकासकामांबाबतची मानसिकता ही अल्पसंतुष्ट आहे, तर इतर प्रांतांतील विकासकामांबाबतची मानसिकता ही विकासाभिमुख असल्याचे ते सांगतात. यात बदल व्हायला हवा, असे डॉ. चोरगे यांनी सांगितले. मी गेली २५ वर्षे कोकणात आहे, तरीही माझा अजूनही घाटावरील असा उल्लेख होतो, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आमदार संजय कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, नगराध्यक्ष जावेद मणियार, पंचायत समिती सभापती गीतांजली वेदपाठक, उपनगराध्यक्ष सचिन जाधव, स्थानिक संचालक जयवंत जालगावकर, सुधीर कालेकर, कार्यकारी संचालक अविनाश दिवाकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, श्री गोपाळकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष राकेश कोटिया, संजय रेडीज, राजू सुर्वे, रमेश दळवी, सूर्यकांत मेहता, चंद्रकांत मेहता, प्रसाद मेहता, सुजय मेहता, सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, सुनील पुळेकर, मनोहर कडके, उपविभागीय अधिकारी देशपांडे, जागामालक अन्वर रखांगे, गोपाळ वटवाणी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) कोकणातील शेतकरी व्यवहारज्ञानी. कोकणातील शेतकरी हवे तेवढेच कर्ज घेतो व वेळेत परत करतो. विकासकामांबाबत मानसिकता अल्पसंतुष्ट. अजूनही घाटावरचा असा उल्लेख.
बरं झालं; सहकार रूजला नाही
By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST