आचरा : आमदार असताना प्रकल्पाला विरोध करणारे पालकमंत्री दीपक केसरकर गृहराज्यमंत्रीपद मिळताच सी-वर्ल्ड प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत. गृहराज्यमंत्रीपद मिळाल्याने ते दडपशाहीची भाषा वापरत आहेत. या शब्दात वायंगणी ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. वायंगणी ग्रामपंचायतीच्या झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. एका बाजूला गाव प्रकल्पाच्या विरोधात असताना आणि या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ महिंलांसह उपोषणास बसले असताना पालकमंत्री ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेण्यास फिरकलेच नाहीत. उलट लवकरच भूसंपादन होणार असल्याचे जाहीर करतात. त्यांची ही भाषा भाजपच्या, शिवसेनेच्या की, कॉँग्रेसच्या भूमिकेतून निघत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, ग्रामस्थांच्या पाठीशी उभे आहेत. हा प्रकल्प माफी मागू देणार नाही. असे वारंवार सांगत आहेत. असे असताना दीपक केसरकर ग्रामस्थांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. हे पालकमंत्री नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? असा प्रश्नही यावेळी पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांच्यासोबत वायंगणीचे ग्रामस्थ प्रफुल्ल माळकर, दीपक दुखंडे, विजय दुखंडे, संतोष सावंत, शिवाजी साळकर, प्रवीण माळकर, सुधाकर वालावलकर, प्रशांत सावंत आदी उपस्थित होते. सी-वर्ल्डसाठी जमीन संपादित करण्यासाठी खासगीत फतवा काढल्यानंतर जमीनीचे सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर घेऊन एजंट जमीन खरेदीसाठी फिरत आहेत. ग्रामस्थांकडे जबरदस्तीने जमीनीची चौकशी करीत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून ग्रामस्थांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला पालकमंत्री जबाबदार असतील. असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
पालकमंत्र्यांवर ग्रामस्थांचा हल्लाबोल
By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST