कुडाळ : अतितीव्रतेमुळे भूसुुरूंग लावल्यामुळे जाब विचारण्यास गेलेल्या परुळे चिपी येथील ग्रामस्थ व चिपी विमानतळाचे अधिकारी यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिपी विमानतळाचे काम युध्द पातळीवर सुरू असून हे काम लवकर होण्याकरिता या ठिकाणी जमीनीमध्ये परवानगी नसतानाही अतितीव्रतेचे भूसुरुंग लावलेले आहेत. त्यामुळे येथील आजूबाजूच्या गावाला भूकंपासारखे हादरे बसतात. येथील घणांना तडे जात आहेत. भिंती पडून राहत्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या ठिंकाणी अतितीव्रतेचे भुसुरुंग लावू नये, याकरिता वेळोवेळी जनतेने आंदोलन केली. परंतु आंदोलने सुरू झाल्यानंतर काही काळ भूसुरुंगांचे काम कमी तीव्रतेचे भुसुरुंग वापरून करण्यात येत असे. परंतु नंतर पुन्हा भुसुरुंग अति तीव्रतेचे वापरण्यात येत असतात. हल्ली गेले काही दिवस सांगूनही या विमानतळाच्या कामाकरिता अतितीव्रतेचे भूसुरुंग वापरण्यात येत होते. त्यामुळे याबाबत जाब विचारण्यासंदर्भात येथील ग्रामस्थ चिपी विमानतळाच्या कार्यालयाकडे गेले. त्यावेळी ग्रामस्थ व अधिकारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची व नंतर धक्काबुक्की झाली. त्यामुळे हा वाद पुन्हा चिघळला आहे. (प्रतिनिधी)
चिपीमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार
By admin | Updated: July 10, 2014 23:35 IST