सावंतवाडी : मालवणी भाषा टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. मालवणी भाषेचा गोडवा सर्वदूर असून, पुन्हा एकदा मालवणी भाषेचा डंका सातासुमद्रापार घुमू दे, यासाठी स्वत: मी पुढाकार घेईन, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. ते येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘मालवणी करंडक’ या मालवणी एकांकिका महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, तालुकाप्रमुख नगराध्यक्ष बबन साळगावकर, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, दादा मडकईकर, विक्रांत सावंत, अमोल टेमकर, मिल्ािंद कासार, निरंजन सावंत, अभिमन्यू लोंढे, रूजूल पाटणकर आदी उपस्थित होते.खासदार राऊत म्हणाले, मालवणी भाषेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी केले होते. पण त्यांच्या पश्चात मालवणी भाषा थोडीशी कुठे तरी कमी पडत असल्याचे दिसत आहे. पण सर्वांनी प्रयत्न केले, तर मालवणीला पुन्हा चांगले दिवस येतील. मालवणीची गोडी सर्वत्र आहे. याचा प्रत्यय मला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे सध्या सिंहस्थ कुंभमेळा चालला असून, यामध्ये महाराष्ट्राच्या दोन कला गेल्या आहेत. त्यात सिंधुदुर्गची दशावतार कला असून, या कलेला मध्यप्रदेशात सर्वांनी उचलून धरले आहे, असेही यावेळी राऊत यांनी स्पष्ट केले. मालवणी भाषेला प्रत्येकाने न्याय दिला पाहिजे. सिंधुदुर्गमधील प्रत्येकाची बोली भाषा मालवणी असली पाहिजे, असे सांगत मालवणीचा डंका सातासमुद्रापार लंडनमध्ये पुन्हा एकदा घुमू दे. याला मालवणी करंडकाचा हातभार लागू दे, असेही यावेळी खासदार राऊत म्हणाले.पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मालवणी जगली पाहिजे. यासाठी सरकार म्हणून आम्ही निश्चित प्रयत्न करू. त्यासाठी येथील लोकांची साथ असली पाहिजे. मालवणी भाषा बोलण्यास सोपी आहे. पण ती सतत बोलली गेली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘रात्रीस खेळ चाले’च्या माध्यमातून मालवणीला पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागल्याचा उल्लेखही यावेळी केसरकर यांनी केला. यावेळी भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानचे विक्रांत सावंत यांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मालवणी करंडकच्या महोत्सवा आयोजित करणाऱ्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, काँग्रेस नेते विकास सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये पत्रकार दिनेश केळुसकर, बाळा कदम, अमोल गोसावी, प्रसिध्द कवी दादा मडकईकर आदींचा या समावेश आहे. यावेळी डी. के. सावंत उपस्थित होते.प्रास्ताविक मिलिंद कासार यांनी, आभार प्रा. हसन खान यांनी मांडले. (प्रतिनिधी)विकास सावंत व प्रविण भोसलेंची भेटकाँग्रेस नेते विकास सावंत व माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी मालवणीबद्दलच्या आठवणी कथन करीत मालवणीच्याबाबतीत आपल्या जीवनात घडलेले प्रसंग सांगितले. मालवणीतून घातलेल्या शिवीचाही कुणाला राग येत नाही, असे विकास सावंत यांनी आवर्जून सांगितले. तर माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनी मालवणी भाषा वस्त्रहरण नाटकाच्या माध्यमातून परदेशात पोहोचली आणि या भाषेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मालवणी भाषेतून तयार केलेले विनोद लगेचच प्रसिद्ध होतात. तसेच ही भाषा विचार करावयास लावणारी आहे. आपण राजकारणात राज्यातील इतर भागात काम करीत असताना आपले पक्षश्रेष्ठी काहीवेळा आपल्याला मालवणी भाषेतून भाषण करण्याचा आग्रह करीत असतात, असेही यावेळी सांगितले.मालवणी करंडक महोत्सवाच्या निमित्ताने विक्रांत सावंत यांचा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, बबन साळगावकर, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.
मालवणी भाषेचा डंका सातासमुद्रापार घुमू दे
By admin | Updated: May 23, 2016 00:16 IST