सावंतवाडी : इन्सूली सूतगिरणीची काही रक्कम शासनाला देणे असताना शासन नियम धाब्यावर बसवून तत्कालीन तहसीलदार विकास पाटील यांनी बिनशेती परवानगी देण्याकरिता नाहरकत घेतली होती. मात्र, आता सावंतवाडी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सूत गिरणीच्या जागेत रेखांकन तसेच बिनशेती करण्यास अंतिम निकालापर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबतची माहिती विकास केरकर यांनी दिली आहे.विकास केरकर यांनी संघर्ष समितीच्या वतीने या जमिन विक्रीला आक्षेप घेत आहे. याबाबत माहिती अशी की, इन्सुली येथील रत्नागिरी पॉवरलूम व्हीव्हर्स को आॅफ स्पिनिंग मिलच्या सुतगिरणीच्या मिळकतीस महाराष्ट्र शासनाचे ११ कोटी ७६ लाख सहा हजार ७४४ एवढी रक्कम थकित असतानाही सावंतवाडीचे तत्कालीन तहसीलदार विकास पाटील यांनी जमिनीच्या निवासी करण्याकरिता तसेच बिनशेती आदेश दिला होता. मात्र, या आदेशाला आता उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी अंतिम निकालापर्यत स्थगिती आदेश दिला आहे. या स्थागितीमुुळे रेखांकन व बिनशेती करता येणार नाही. याबाबतचा आक्षेप रत्नाकर हळदणकर व विकास केरकर यांनी घेतला होता. विकास केरकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, तिलारी कालव्यासाठी संपादित असलेल्या प्रस्तावाची नोंद ही सातबारा उताऱ्यावर असताना सुध्दा व गावातील लोकांची हरकत असतानाही बांद्याचे तत्कालीन मंडळ यांनी खरेदी खताची नोंद पोट फेरफार पाडून गाव दप्तरी केली. तसेच इन्सुली तलाठी यांनी मंडळ अधिकारी यांच्या संगनमताने तुकडे बंदी व तुकडे जोड कायद्याच्या तरतुदींचा भंग करून सातबारा उताऱ्यावरील जमीन मालकांची संमती न घेता विभाजन केले. या बिनशेती आदेश विक्रीबाबत केरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर तत्कालीन प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. अखेर नूतन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सदर बिनशेतीला स्थगिती दिली आहे. (प्रतिनिधी)
तत्कालीन परवानगीला स्थगिती
By admin | Updated: July 10, 2014 23:35 IST