मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेत जुने नवे कोणतेही वाद नाहीत. राष्ट्रवादीतून सेनेत प्रवेश केलेल्या व पूर्वीच्या शिवसैनिकांना एकत्र घेऊनच शिवसेनेची संघटना वाढत आहे. शिवसेना विकासाच्या बाजूने नेहमीच सकारात्मक असते. आगामी निवडणुकात विकासकामांचा अभ्यास करूनच निवडणूक लढविली जाणार आहे. निवडणुकांचा विचार करता युती करण्याबाबत भाजपशी चर्चा केली जाईल. मात्र, त्यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली असेल तर जिल्ह्यातील सर्वच पालिकांवर भगवा फडकवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, देवगड, ओरोस नगरपंचायत तसेच मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला नगरपरिषदांच्या निवडणुकीपूर्वी मित्रपक्ष भाजप सोबत आला तर ठीक अन्यथा सर्व पालिका निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष स्वतंत्र लढेल, अशी स्पष्ट भूमिका मांडताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते मरगळ झटकून कामाला लागणार आहेत, असेही राऊत यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह मालवण येथे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर कार्यकारिणीची बैठक खासदार राऊत यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा संघटक जान्हवी सावंत यांच्या उपस्थितीत बंद खोलीत पार पडली. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, पपू मिठबावकर, हरी खोबरेकर, सेजल परब, नितीन वाळके, राजा गावकर, दीपक मयेकर यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मालवण शहरप्रमुख नंदू गवंडी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नव्या शहर अध्यक्षाची लवकरच निवड केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सी-वर्ल्डबाबत जठारांकडून दिशाभूलसी वर्ल्ड प्रकल्पास विरोध असेल तर तो दुसरीकडे नेऊ ही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची भूमिका खोडून काढताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, आधी प्रकल्पाचा आराखडा तयार करा, जागा निश्चिती करा. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाची कमी केलेली जागा अभिनंदनीय आहे. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने केवळ विरोध आहे असे दाखवून सी वर्ल्ड हलविण्याचा प्रयत्न सुरु आहे. जागा निश्चिती करून जर वायंगणी तोंडवळी ग्रामस्थांची सहमती असेल तर प्रकल्प साकारावा. उगाचच प्रकल्प देवगड, वेंगुर्लेला नेणार या हवेतील बाता मारून जनतेची दिशाभूल करू नये, असाही टोला राऊत यांनी जठार यांना लगावला.
सर्व पालिकेत भगवा फडकवणार
By admin | Updated: May 23, 2016 00:26 IST