सावंतवाडी : आपल्या शरीरामध्ये देवाने जे नैसर्गिक गुण दिले आहेत त्या गुणांचा विकास करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. कुठल्याही स्पर्धेमध्ये हार जीतही होतच असते. मात्र, स्पर्धेमध्ये अंगामधील कौशल्य वाढवितानाच मित्रत्वाच्या बंध जपत स्पर्धेचा निखळ आनंद घ्या, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी नगराध्यक्ष चषक इनडोअर स्पर्धा २०१४ च्या उद्घाटन प्रसंगी आमदार केसरकर जिमखाना स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, अनारोजिन लोबो, महिला बालकल्याण सभापती किर्ती बोंद्रे, अशोक दळवी, शर्वरी धारगळकर, देवेंद्र टेमकर, साक्षी कुरतडकर, शैलेश नाईक आदी उपस्थित होते.यावेळी आमदार केसरकर म्हणाले की, आपल्यामधील जे गुण आहेत त्या गुणांचे सातत्याने जतन करत राहणे आवश्यक आहे. आपल्यातील खेळाडू गुण वाढविले पाहिजे म्हणून नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी चार खेळांचे आयोजन केले आहे. खेळताना जिंकण्यासाठी न खेळता खेळाडूंनी अंगामधील कौशल्य वाढविले पाहिजे. मित्र हे अनमोल असतात. या स्पर्धेमध्ये मित्रही वाढविले पाहिजेत. खेळताना खेळाचा आनंद घ्या, असा सल्ला सर्व मुलांना दिला. स्पर्धेसाठी आलेले पंच सूर्यकांत पेडणेकर, कोल्हापूरहून आलेले विजय सुतार, प्रदिप जोशी, राजन नाईक, सचिन घाडी आदींचे स्वागत करण्यात आले. उपस्थित स्पर्धकांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्याची शपथ घेतली. यानंतर कॅरम हॉलचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले. यावेळी नगरसेविका किर्ती बोंद्रे, अनारोजिन लोबो, नगरसेवक राजन पोकळे यांनीही कॅरम खेळाचा आनंद लुटला. यानंतर बुद्धीबळ, टेबल टेनिस व बॅडमिंटन या खेळांचे उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. (वार्ताहर)
खेळात मित्रत्वाचे बंध जपा
By admin | Updated: July 10, 2014 23:38 IST