रत्नागिरी : शहरातील सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांची दोन पथके झारखंड जमतारा व दिल्ली येथे रवाना करण्यात आली आहेत. त्यामुळे बनावट दूरध्वनी करून लाखो रुपयांची लूट करणारे काही सराईत गुन्हेगार हाती लागण्याची अपेक्षा आहे. गेल्या चार महिन्यांत असे ३० गुन्हे दाखल झाले आहेत.रत्नागिरी शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. खून, हाणामारी, घरफोडी असे अनेक प्रकारचे गुन्हे शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. यातील काही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यशही आले आहे, परंतु वाढती सायबर गुन्हेगारी पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. मी बँक मॅनेजर बोलतोय, लॉटरी लागली आहे, अशा गोष्टींना व आमिषांना भुलून अनेक जणांची फसवणूक झाली आहे. कोणाला नोकरीचे गाजर दाखवून, तर कोणाला लॉटरीच्या पैशांचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना पकडण्याचा चंग शहर पोलिसांनी बांधला आहे. गेल्या चार महिन्यांत ३० गुन्हे दाखल झाले असून, सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांत ४८ जणांना दहा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. हे बनावट दूरध्वनी परराज्यांमधून येत असल्याने त्यांचा तपास करण्यात अडचणी येत आहेत, परंतु आता अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी दंड थोपटले आहेत. (वार्ताहर)
सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिस पथके दिल्लीकडे
By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST