महेश चव्हाण _ ओटवणे , तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालव्यांची कामे पद्धतशीर न झाल्याने ओटवणे येथील स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या आधीच शेतकऱ्यांना विविध अडचणींनी ग्रासलेले असल्याने काही काळ पडलेल्या पावसाचे पाणी थेट कालव्यात जाऊन मुख्य हौदात पाणी साचते. पावसाची अनियमितता शेतीसाठी घातक ठरत असतानाच पावसाचे पाणीही कालव्यांमध्ये साचल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही आणि आता मुसळधार पावसामुळे कालव्यात साठलेले पाणी शेतांमध्ये येत असल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी झाल्याचेच चित्र या भागात दिसत आहे.तिलारी मध्यम पाटबंधारे प्रकल्प कालवा हा ओटवणे गावच्या मध्यावरुन जात आहे. हरितक्रांतीच्या उद्देशाने उभारलेल्या या कालव्यात मात्र, मागील दहा वर्षात तिलारीचे पाणी पोहोचलेले नाही. परंतु, या प्रकल्पांच्या कामांमुळे ओटवणेतील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ओटवणे मांडवफातरवाडी भागात गतवर्षी कालवे नादुरुस्ती स्थितीमुळे पाण्याने पूर्ण भरले जात होते. डोंगरभागावरुन वाहत येणाऱ्या पाण्याला पलिकडे जाण्यासाठी वाटच उपलब्ध नसल्याने स्थानिकांना कठिण परिस्थितींना सामोरे जावे लागले होते. कालव्यात साठलेले पाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहत शेतांमध्ये घुसले होते. लावणी केल्यानंतर पाणी शेतात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने घरांमध्येही ओल आली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर यावर्षी पाईप टाकून दुरुस्ती करण्यात आली. मात्र, ओटवणे गावातील काही भागात अशा प्रकारच्या उपाययोजना न केल्याने पाणी शेतात घुसण्याचे प्रकार सुरुच आहेत. त्यामुळे कालव्याच्या पलिकडच्या शेतकऱ्यांना पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे पावसाच्या अनियमिततेमुळे या शेतकऱ्यांना लावणीसाठीही पाणी मिळाले नव्हते.
ओटवणेतील शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी
By admin | Updated: July 10, 2014 23:39 IST