कसई-दोडामार्ग : शिरवल गावातील सामाईक जमिनींचे धडेवाटप करण्यात आलेले नाही. या जमिनींमध्ये केरळीयनांनी अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणात झाडांची तोड केली आहे. त्यामुळे शिरवल येथील जमिनीचे भागधारक व ग्रामस्थांनी बेकायदेशीररित्या सुरु असलेले अतिक्रमणाचे काम बंद पाडले.शिरवल गावातील असणाऱ्या सामाईक जमिनीतील विक्रीपैकी गावच्या वहीवाटीत असणाऱ्या जमिनीत परप्रांतीय (केरळीयन) लोकांनी रबर लागवडीसाठी जेसीबी व पोकलँडच्या सहाय्याने जंगलतोड करून सुमारे ३०० एकर सामाईक जमिनीवर अतिक्रमण केले. या अतिक्रमणाला विरोध करण्यासाठी शिरवल ग्रामस्थांची बैठक श्री हरी सातेरी मंदिरात पार पडली. यावेळी संपूर्ण गावातील लोक उपस्थित होते. यावेळी एकमताने परप्रांतीयांचे अतिक्रमण थांबविण्यासाठी विरोध करण्याचे ठरले.या जमिनीच्या विक्रीच्या विरोधात शिरवल ग्रामस्थ अनेक वर्षांपासून आहे. जमीन सामाईक असल्यामुळे तसेच जमिनीचे धडेवाटप न झाल्याने या जमिनीत भागधारकांनी मामलेदार कोर्टात कुळवहीवाटीचा दावा दाखल केला होता. त्याचा निकाल शिरवल ग्रामस्थांच्या बाजूने लागला आणि ग्रामस्थांची असणारी तीनशे वर्षांपासूनची वहीवाट न्यायालयाने मान्य केली.याशिवाय या सामाईक क्षेत्रातील जमिनीच्या विरोधात सावंतवाडीतील दिवाणी कोर्टात चंद्रशेखर देसाई यांच्या दाव्यावर स्टे आॅर्डर असताना सुध्दा पैसा आणि राजकीय ताकद याच्या आधारावर या जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार होऊन अतिक्रमण करण्यात आले. या जमीनक्षेत्रामध्ये वनसंज्ञाखाली क्षेत्र येत असून या जमिनीची विक्री होऊन बेकायदेशीर जंगलतोड होऊन जमिनीत सपाटीकरणाच्या आधारे काम केल्याने भविष्यात धरणाला याचा धोका आहे. ग्रामस्थांनी परप्रांतियांचे काम बंद पाडत विरोध करून भविष्यात कोणत्याही परिस्थितीत परप्रांतीयांना गावात, शेतात शिरकाव करू न देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी चंद्रशेखर अर्जुन देसाई, शिवराम बाळकृष्ण देसाई, तुकाराम महादेव देसाई, आपा बाळाजी जोगल, अमोल लाहू नाईक, प्रभाकर भिकू देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
परप्रांतियांच्या अतिक्रमणाला स्थानिकांचा थांबा
By admin | Updated: July 10, 2014 23:36 IST