भुईबावडा : उपळे पालांडेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या वाडीतील गुरांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना या बिबट्याने भक्ष्य केले असून बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.उपळे पालांडेवाडी येथील रामदास सखाराम पालांडे यांनी जवळच्या कुरणात गुरांना सोडले असता त्यातील एका गायीला बिबट्याने भक्ष्य केले आणि गायीचा फडशा पाडला. या वाडीतील पाळीव कोंबड्या आणि कुत्र्यांनाही या बिबट्याने लक्ष्य केले आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे रात्रीच्यावेळी एकट्या दुकट्या नागरिकाला घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून या बिबट्यापासून लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे या वाडीतील नागरिक बिबट्याच्या वावरामुळे भयभीत झाले आहेत. या परिसरातील बिबट्याचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणीही नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
उपळे परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By admin | Updated: December 1, 2014 00:18 IST