सावंतवाडी : कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील हत्तींकडून झालेले नुकसान समर्थनीय नाही. मात्र, त्यांना मारण्याचा निर्णय घेऊन आक्रमक नागरिकांना शांत करण्याचा घेण्यात आलेला निर्णय चुकीचा आहे. या हत्तींचे पुनर्वसन करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी प्राणीमित्र संघटनेनेने केली आहे.कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे हत्तींच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. हत्तींनी शेतकऱ्यांचा जीवही घेतला आहे. दोन महिन्यात हत्तीबाधित क्षेत्रातील तीन जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे माणगाव येथे गेलेल्या लोकप्रतिनिधी व वन अधिकाऱ्यांनी हत्तींना मारण्याचा काढलेला मार्ग चुकीचा आहे. जर एखाद्या आरोपीलाही न्यायालय चांगल्या वागण्याच्या अटीवर सोडून देऊन त्याला जीवन जगण्याची संधी देत असेल तर जंगली प्राण्यांचे संवर्धनही होणे गरजेचे आहे. भविष्याचा विचार करता जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचे संवर्धन गरजेचे असल्याने या हत्तींना जेरबंद करत त्यांचे जंगलांमध्ये पुनर्वसन करणे आवश्यक आहे. (वार्ताहर)केवळ लोकांच्या संतप्त भावना शांत करण्यासाठी हत्तींना मारण्याचा घेतलेला निर्णय योग्य नसून त्यांच्या पुनर्वसनाकडे लक्ष पुरविले जाण्याची गरज असल्याचे विद्यार्थी प्राणी मित्र संघटनेचे म्हणणे आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून सावंतवाडी तहसीलदार, वनअधिकारी यांनाही याची प्रत देण्यात आली आहे. हत्तींनाही जीवन जगण्याचा हक्क असून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात १८५ विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करुन पाठिंबा दर्शविलेला आहे.
हत्तींना मारणे हा सुटकेचा पर्याय नाही
By admin | Updated: July 10, 2014 23:39 IST