चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीत ५०० कोटींचा कोकाकोला प्रकल्प आल्यास औद्योगिक विकासाला गती मिळणार असून, आर्थिक सुबत्ता येणार आहे. बेरोजगारी कमी होणार आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून या प्रकल्पाचे स्वागत होत आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत गेली अनेक वर्षे नव्याने कोणताही मोठा प्रकल्प आलेला नाही. येथील रासायनिक प्रकल्प आता अखेरच्या घटका मोजत आहेत. त्यांच्याबाबत नागरिकांमध्ये ओरड सुरु आहे. स्थानिक पातळीवर बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नवीन प्रकल्प न आल्याने रोजगाराची संधी उपलब्ध नाही शिवाय फारसा विकासही झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूयॉर्क येथे कोकाकोला प्रकल्पाबाबत करारावर शिक्कामोर्तब केले आणि येथील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या. केवळ प्रकल्प येणार, या एका अपेक्षेनेच सुखाची लहर आली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत कोकाकोलासारखा प्रकल्प आल्यास अनेक लहान लहान उद्योगधंदे आकारास येतील. छोट्या उद्योजकांना चालना मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कामाला लागेल. बाजारात आर्थिक सुबत्ता येईल. परिसरातील लोकांना रोजगाराबरोबर चांगले पैसे मिळतील. त्यामुळे सर्वांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. कोयनेचे समुद्राला मिळणारे प्रचंड अवजल व जवळच असलेला कोकण रेल्वे मार्ग, गुहागर, दाभोळ व दापोली ही जवळ असणारी बंदरे, महामार्गाचे चौपदरीकरण या गोष्टी प्रकल्पासाठी पूरक ठरणार आहेत. (प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने बाहेरील उद्योग व व्यवसाय भारतात येण्यासाठी कटकटीच्या ठरणाऱ्या कागदपत्रांचा परवानाराज संपविला आहे. एखादा उद्योग सुरु करण्यापूर्वी ७६ प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागत होत्या. आता ३७ परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे मोठे प्रकल्प येथे येण्यास पूरक वातावरण निर्माण होईल, असे वाटते.- डॉ. प्रशांत पटवर्धन, अध्यक्ष, लोटे परशुराम उद्योजक संघटना लोटे औद्योगिक वसाहतीत ५०० कोटीचा कोकाकोला प्रकल्प येतोय. ही बाब वृत्तपत्रात वाचली व समाधान वाटले. हा प्रकल्प येथे आल्यास काही बऱ्या-वाईट घटना घडणार आहेत. कारण नेहमी चांगल्याबरोबर वाईट येतेच. पण या प्रकल्पामुळे बेरोजगारांना काम मिळेल, उद्योगधंदे वाढतील. पुन्हा एकदा या औद्योगिक वसाहतीला वैभव प्राप्त होईल. - श्रीराम खरे, माजी अध्यक्ष, लोटे परशुराम उद्योजक संघटना.सध्या रत्नागिरी जिल्ह्यात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. कोणताही मोठा प्रकल्प कोकणात न आल्याने येथे बेकारी वाढली आहे. आता कोकाकोला प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणवासीयांसाठी एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे कच्चा माल बनविणाऱ्या लघुउद्योजकांना चांगला वाव मिळेल. अनेक कामगारांच्या हाताला काम मिळेल.- इब्राहिम दलवाई, प्रभारी अध्यक्ष, उत्तर रत्नागिरी उद्योजक संघटना.लोटे औद्योगिक वसाहतीचा सुवर्णकाळ आला आहे. ‘अच्छे दिनची पहाट’ हे वृत्त वाचनात आले व आशा पल्लवित झाल्या. अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजांपासून वंचित असलेल्या लोकांचा पूर्वीचा काळ राहिलेला नाही. ३५ जिल्ह्यातून कोकण विभागात हा प्रकल्प येतोय म्हणजे सुवर्णयुगाची सुरुवात आहे, असे म्हणणे उचित होईल. हा एक मोठा योग आहे. - अनंत सुतार, उपाध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात कोकाकोलासारखा मोठा प्रकल्प आपल्याकडे येत आहे. ही चांगली गोष्ट आहे. आम्ही स्वागत करतो. पण, या सॉफ्ट ड्रिकप्रमाणे येथे स्थानिक कोकम, जांभूळ व इतर फळांवर प्रक्रिया करुन त्यापासून शीतपेयाचे वेगवेगळे प्रकार बनविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. - डॉ. मिलिंद गोखलेजीआयटी व्यवस्थापक
कोकाकोला आल्यास हजारोंच्या हाताला काम
By admin | Updated: July 2, 2015 00:28 IST