ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी तसेच आंबा, काजू बागायतदारांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोसम सुरू होतानाच पावसाने हजेरी लावल्याने कर्ज काढून झाडांची मशागत केलेल्या बागायतदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या अस्मानी संकटाने येथील शेतकरी हवालदील झाला आहे. सर्वत्र आंब्याचा मोहोर गळून पडल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आंबा आणि काजू नुकसानीबाबतचा प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हाधिकारी आणि कोकण आयुक्तांनी सोमवारी सादर केला.शनिवारपासून पडत असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसला असून प्रशासनाने याबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यात जिल्ह्यातील एकूण ५४७ गावांमधील ४९४१ शेतकऱ्यांच्या ४,७३४ हेक्टर आंबा पिकाची नुकसानी झाली आहे. तर काजू पिकाबाबत जिल्ह्यातील ४८८ गावांमधील ४0९९ शेतकऱ्यांच्या ३६७४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.जिल्ह्यात शनिवारी हजेरी लावलेल्या पावसाने रविवारीही सातत्य राखले होते. दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे बागायतदार, शेतकरी नाराज झाले आहेत. देवगड तालुक्यातील कोटकामते कुंभारवाडी येथील उत्तम हिंदळेकर यांची १० एकर आंबा पिकाची बागायत आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच विजय हिंदळेकर, प्रदीप पारकर, उत्तम दळवी, राजाराम आजगावकर, शिवराम हिंदळेकर, अनंत हिंदळेकर, शरद हिंदळेकर, कामतेकर अशा अनेक आंबा बागायतदारांचेही लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.वर्षभर हजारो आंब्यांच्या कलमांची साफसफाई, औषध फवारणी व इतर खर्च असा ४ लाख रूपयांहून खर्च एका बागायतदाराला सामान्यपणे येत असतो. मे महिन्याच्या हंगामात जर पाऊस पडला तर कर्ज काढून केलेल्या कामाची नुकसानी मोठ्या प्रमाणात होते. ही नुकसान भरपाई आम्हाला कोण देऊ शकेल? असा प्रश्न जिल्ह्यातील बागायतदारांमधून विचारला जात आहे.काजू, आंबा पिकाला जानेवारीमध्ये सुरूवात झाली होती. मात्र ऐन मोसमात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बागायतदारांवर तसेच या बागायतीवर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.देवगड हापूस आंबा हा देशात एक नंबरचा आंबा म्हणून ओळखला जातो. अचानक पडलेल्या पावसामुळे या आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा बागायतींमध्ये सर्वत्र हा आंबा जमिनीवर पडलेला दिसत आहे. आज आंब्याच्या एका डझनाची किंमत २ ते ३ हजार रूपये आहे. काही बागायतदारांचे आंबे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. मात्र अवकाळी पावसाने बागायतदारांच्या वर्षभर केलेल्या मेहनतीवर एका झटक्यात पाणी फिरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बागायतदार चिंतातूर बनले आहेत. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन तातडीने मदत करावी, अशी मागणी बागायतदारांमधून करण्यात येत आहे. (वार्ताहर)फोंडाघाटमध्ये दरड कोसळून वाहतूक दोन तास ठप्पअवकाळी पावसाने फोंडाघाटात सोमवारी पहाटे दरड कोसळली. यामुळे घाटमार्ग दोन तास ठप्प राहिला. अकरा वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्ववत सुरू झाली. अवकाळी पावसामुळे माती भुसभुशीत झाल्याने दरड कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास दगड आणि मातीचा मोठा ढिगारा घाटमार्गावर कोसळला. यामुळे मार्ग पूर्णत: ठप्प झाला होता. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याची माहिती मिळताच पोलिस पथक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता के. कन्नादासन आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दोन जेसीबींच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. आठ वाजण्याच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू झाली. अकरा वाजेपर्यंत रस्त्यावरील दगड आणि माती पूर्ण हटवून मार्ग सुरळीत करण्यात आला.अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात परिस्थितीचा अहवाल शासनास तत्काळ सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत. त्याप्रमाणे वस्तुस्थितीचा अहवाल लवकरच सादर केला जाईल. मात्र शासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश प्राप्त झाले नाहीत. शासन निर्देश प्राप्त होताच तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनास सादर केला जाईल.- ई. रवींद्रन, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
बागायतदारांवर अस्मानी संकट
By admin | Updated: March 3, 2015 00:28 IST