आंबा बागांचे होणारे नुकसान टाळणे शक्य नाही. परंतु उपायाअंती नुकसानीचे प्रमाण कमी करता येऊ शकते. अवकाळी पावसामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे; तर कोकणातील आंबा बागायतदार संकटात सापडला आहे. या पावसामुळे आंबा बागायतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मात्र, त्यावर उपाययोजना केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठातील वनस्पती क्रीया शास्त्रज्ञ विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मुराद बुरोंडकर यांनी केले आहे. पावसामुळे विविध ठिकाणी झालेल्या आंबा बागायतीच्या नुकसानीबाबत बुरोंडकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक उपाययोजनाही सुचविल्या. कोकणात दोन दिवस पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू पिकांवर कोणता परिणाम होणार, याबाबत वनस्पती क्रिया व आंबा शास्त्रज्ञ डॉ. मुराद बुरोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आंबा बागांची पाहणी करुन अनेक शक्यता व्यक्त केल्या. कोकणातील हापूस व इतर आब्यांची चार प्रकारची अवस्था सांगितली. प्रथम अवस्था म्हणजे एक-दोन आठवड्यात आंब्याच्या झाडाला नुकताच मोहोर आला आहे. दुसरे म्हणजे दोन आठवड्यापूर्वी कणीएवढी झालेली फळधारणा, तिसरी अवस्था म्हणजे सुपारीएवढी फळधारणा आणि चौथी अवस्था म्हणजे आंबे तयार होण्याच्या मार्गावर आहेत. काही आंब्यांमध्ये बाटासुद्धा तयार आहेत. अशा चार अवस्थेच्या प्रकारांवर नुकत्याच पडलेल्या पावसाने परिणाम होण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात आंबा मोहोर करपेल, तर काही प्रमाणात फळांची गळसुद्धा होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या पावसामध्ये मोहोरावरील परागीकरणावर परिणाम होईल. नर व मादी फुलांचे परागीकरण होणे फार महत्त्वाचे असते. मोहोरावरील करपा व भुरी रोगामुळे परागीकरणाची होणारी देवाण-घेवाण थांबेल व त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यातील मोहोराच्या आशा पूर्णपणे मावळण्याची स्थिती सध्याच्या पावसाने केली आहे. पावसामुळे आंबा बागांचे भविष्यात होणारे नुकसान फार मोठे आहे. पुढील काही दिवसात फळधारणा झालेली फळे काही प्रमाणात गळून पडतील. दोन आठवड्यांपूर्वी हरभऱ्याएवढी झालेली फळे मोठ्या प्रमाणावर गळायला सुरुवात होईल.फळमाशी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव ढगाळ वातावरणामुळे हापूसच्या झाडांवर आढळून येतो. त्यामुळे बुरशीनाशके फवारुन व रक्षक सापळा आंब्याच्या झाडाला बांधून होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. आंबा पिकावरील बुरशी, करपा व भुरी रोगाचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात कमी करता येऊ शकते.आंबा बागायतदारांनी या पावसामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कीटकनाशके फवारण्याबरोबरच बागायतीतील झाडांना दोन ते तीन वेळा पाणी दिल्यास होणारी फळांची गळ कमी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी बुरशीनाशके फवारणीबरोबरच पाणीसुद्धा देणे गरजेचे आहे. ढगाळ वातावरण राहिल्यास विद्यापीठाने त्या-त्यावेळी केलेल्या शिफारशींचे पालन करुन बुरशीनाशक कीटकनाशके फवारावीत. त्यामुळे पुढील होणारे रोग टाळता येणे शक्य होते. ढगाळ वातावरणामुळे तयार झालेल्या अळी जमिनीवर पडून जमिनीत अंडी घालतात व त्या अंड्यातून निर्माण झालेली अळी प्रौढ झाल्यावर पुन्हा फळावर हल्ला करते.परिपक्व तयार झालेली फळे काढल्यास द्रावणात बुडवून मगच पेंढ्यात किंवा अढी लावून ठेवावी. आंबापेटी भरण्यापूर्वी परिपक्व आंब्याचे निर्जंतुकीकरण करावे नाहीतर देठाजवळील बुरशी आंब्यावर परिणाम करुन गुणात्मक दर्जावर परिणाम करते.आंबा बागायतदारांनी अवकाळी पावसामुळे झाडाखाली गळून पडलेली फळे, मोहोर, लहान-मोठी कैरी झाडून घेऊन स्वच्छ करावी व झाडापासून लांब खड्ड्यात कीटकनाशक टाकून बुजवून टाकावी. नाहीतर त्या फळांवर अळ्या व रोगजंतू तयार होऊन झाडांवरील फळांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.कोकणात गेले दोन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्याचा परिणाम हापूसच्या बागायतीवर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. दापोलीच्या कोकण कृषीविद्यापीठातर्फे वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलांना अनुषंगून हापूस व काजू बागायतींबाबत विविध उपाययोजना सुचविल्या जातात. या उपाययोजनांचे पालन केल्यास बागायतदारांना त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. त्यामुळे बागायतदारांनी सद्यस्थितीत खचून न जाता कोकण कृषी विद्यापीठाच्या सल्ल्याकडे लक्ष ठेवून त्याचा अवलंब करावा. अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून बागायतीमधील संपूर्ण उत्पन्न बाजारपेठेपर्यंत पोहोचू शकत नाही. हे खरे असले तरी त्यातील बहुतांश उत्पन्न हे कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मदतीने उत्पादनात बदल करता येऊ शकतो, एवढे मात्र नक्की. यासाठी बागायतदारांनी सजग राहण्याबरोबरच खचून न जाता अशावेळी नव्याने उभे राहाणे गरजेचे असल्याचे बुरोंडकर म्हणाले.- शिवाजी गोरे
पावसाने आंबा बागायतीवर रोगांचा प्रादुर्भाव
By admin | Updated: March 3, 2015 00:25 IST