सावंतवाडी : गोवा येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकची धडक झाडाला बसल्याने झाडावरील मधमाशांच्या पोळ्याला धक्का बसला. या मधमाशांनी बांदा येथून सावंतवाडीकडे मोटारसायकलने जाणाऱ्या दांपत्यावर हल्ला केला. या दोघांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उशिरापर्यंत उपचार सुरू होते. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. कुडाळ येथील शिवराम मोरे (वय ४९) व पुष्पलता शिवराम मोरे (वय ४२) हे बांदा येथे नातेवाईकांकडे शनिवारी सकाळी गेले होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने बांद्याहून सावंतवाडीमार्गे कुडाळला घरी परतत होते. यावेळी इन्सुली घाटीमधील मोठ्या वळणावर समोरून जाणाऱ्या अवजड वाहनाची धडक झाडाला बसली. यामुळे झाडावरील मधमाशांच्या पोळ्याला धक्का बसला. या मधमाशांनी दुचाकीवरुन येणाऱ्या पुष्पलता मोरे व शिवराम मोरे या दोघांवर जोरदार हल्ला केला. दरम्यान, मागाहून येणाऱ्या आणखी एका मोटारसायकलस्वाराने हा प्रसंग पाहून इन्सुली घाटीलगतच्या धाब्यातील काही युवकांना बोलावून जखमींना धाब्यावर नेले व त्याठिकाणी त्यांच्या अंगावरील काही मधमाशा काढल्या. पोलिसांना याबाबत माहिती देऊन त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (वार्ताहर)
मधमाशांच्या हल्ल्यात दांपत्य गंभीर
By admin | Updated: March 29, 2015 00:51 IST