राजन वर्धन / सावंतवाडी लाचलुचपत विभागामार्फत होणाऱ्या कारवायांनी प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारीवर्ग जाळ्यात जाळ्यात सापडत आहे. शिवाय लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये तरूणाईचा मोठा सहभाग वाढल्याचे सकारात्मक चित्र पाहवयास मिळत आहे. पण झालेल्या या कारवायांमध्ये बहुतांश तृतीय व चतृर्थ वर्गातीलच कर्मचारी अडकत असल्याचे चित्र दिसत आहे. पण मुख्य अधिकारी मात्र अनेक प्रकरणात नामानिराळे राहत आहेत. छोटे गळाला आणि मोठे तळाला अशी स्थिती या कारवाईतून निर्माण झाली आहे. शिवाय जाळ्यात सापडल्यानंतर दोषींवर होणारी अत्यल्प व क्षणिक कारवाई तक्रारदारांमध्ये नाराजीचा सूर निर्माण करण्याबरोबरच या ‘भ्रष्टां’ची मुजोरी वाढवणारी आणि त्यांना मोकाट करणारी ठरत आहे. त्यामुळे लाचलुचपतच्या कारवाईची उणीव स्वच्छ व पारदर्शी प्रशासन निर्मिती करण्यास डोकेदुखी ठरत आहे. तर आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अलिकडच्या काळात लाच स्विकारण्यासाठी खाजगी व्यक्तींचा वापर होत असून लाचलुचपतच्या कारवाईतून पळवाट काढण्याचा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा हा डाव विभागाची पकड ढिली करणारी ठरत आहे. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेची कामे करताना जर पैशाची मागणी केली तर तिच्या विरोधात दाद मागण्याची आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लाचलुचपत विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कारवायांमुळे शासकिय कार्यालयातील भ्रष्टाचारावर काही प्रमाणात नियंत्रणही आले आहे. त्यामुळे आज लाचलुचपत विभागाची ‘क्रेझ’ वाढली आहे आणि यामुळे प्रशासनातही मोठ्या प्रमाणात या विभागाची दहशत निर्माण झाली आहे. पण आतापर्यंत झालेल्या कारवाईचा विचार करता लाच लुचपतच्या विभागाने रचलेल्या सापळ्यात अडकलेल्या कर्मच्याऱ्यांचीच संख्या मोठी आहे. या सापळ्यात मात्र अधिकारी वर्ग अल्प प्रमाणात अडकत आहे. गेल्या दोन वर्षांचा विचार करता २०१५ मध्ये वर्ग एकच्या ७६ अधिकाऱ्यांवर तर वर्ग दोनच्या १२९ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे, या तुलनेत वर्ग तीनच्या १०२६ व तर वर्ग चारच्या ६० कर्मचाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे. म्हणजे जवळपास दहापटीने अधिक अशाप्रकारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली आहे. २०१४ चा विचार करता वर्ग एकच्या १०७ तर वर्ग दोनच्या १८७ अशा एकूण २९४ तर वर्ग तीनच्या १००२ व वर्ग चारच्या ५७ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हे प्रमाण पाहता दहापटीच्या घरातच पोहचते. तर चालु वर्षाचा(५ मे पर्यंत) विचार करता आतापर्यंत वर्ग एकच्या अठरा तर वर्ग दोनच्या २८ अशा एकूण ४६ अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर वर्ग तीनच्या ३२३ व वर्ग ४ च्या ३४२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. हे प्रमाण त्याच दरम्यान आहे. या तीन वर्षातील गुन्ह्यांचा विचार करता २०१४ मध्ये विक्रमी १६८१ इतक्या जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तर २०१५ मध्ये १५८४ जणांना अटक करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४७० जणांना अटक करण्यात आली आहे. या आकडेवारीच्या अभ्यासानंतर असे लक्षात येईल की लाचलुचपत विभागाच्या कारवाईत महसूल व पोलिस यांची स्पर्धा लागून आहे. यामध्ये कधी महसूल विभाग पुढे तर कधी पोलिस विभागाची सरशी होताना दिसते. दरम्यान या स्पर्धेत चालू वर्षी मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोलीस विभागाने आपला अग्रक्रम राखला आहे. तर महसूल दोन नंबरवर आहे. चालू वर्षी ११५ गुन्हे पोलीस विभागावर तर ११० गुन्हे महसूल विभागावर नोंद झाले आहेत. तृतीय क्रमांकावर पंचायत समिती विभागाची नोंद झाली आहे. तर पुणे व औरंगाबाद या विभागात एकूण ६६ गुन्हे नोंद होऊन हे दोन्ही विभाग अग्रक्रमांकावर आहेत. २०१५ मध्ये ३९१ जणांवरील गुन्ह्यांंनी महसूल अग्रक्रमांकावर आहे तर ३६६ गुन्ह्यांनी पोलिस विभाग दोन नंबरवर आहे. पुणे विभागात यावर्षी २२० तर मुंबई विभागात २०० गुन्हे नोंद झाले आहेत. तर नाशिक विभागात केवळ ७२ एवढ्या कमी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान लाचप्रकरणी अटक झालेल्यांवर केवळ निलंबनाचीच कारवाई होते. हे निलंबन तीन ते सहा महिन्यांचे असते असे अधिकारी पुन्हा रूजू होतात. यामुळे तक्रारदारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. लाच घेतल्याचे उघड झाल्यानंतरही असे भ्रष्ट अधिकारी निसटतात, यावरही तक्रारदारांतून तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. शिवाय लाचलुचपतच्या कारवाईत मोठ्याप्रमाणात कर्मचारीच आढळतात. मोठे अधिकारी नामानिराळे राहतात. त्यामुळे या अधिकाऱ्यांनाही चाप लागण्याची गरज आहे. अन्यथा खाणारे राहतील तळाला आणि पुरवणारे लागतील गळाला, अशी गत पाहवयास मिळत आहे. पोलिसांची महसूलशी स्पर्धा : लाचलुचपतचा चाप, प्रशासनाची थाप लाचलुचपतच्या कारवाईत महसुल आणि पोलीस मात्र एकमेकांशी कित्येक वर्षे स्पर्धा करताना दिसत आहेत. महसूल विभागाचा गेल्या वर्षी अग्रक्रम होता. तर यंदा पोलीस विभागाने महसूलला मागे टाकले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या कारवाईत समजून येईल की कोण अव्वल राहते. लाच घेताना अटक झालेल्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबनाच्या किरकोळ कारवाईनंतर पुन्हा रूजू करून घेतले जाते. शिवाय असे अधिकारी तक्रारदाराचा वचपा काढण्यासही मागे पुढे पाहत नाहीत.पण लाचलुचपततर्फे अशा अधिकाऱ्यांना चाप लावला जात असतानाही अशा अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांनाच पुरस्काराची किंबहुना कर्तबगारीची थाप देते. हा गंभीर प्रकारही लाचखोरीला आळा घालण्यास मोठा अडथळा निर्माण करत आहे. गेल्या दोन वर्षातील आकडेवारी २०१४ मध्ये १६८१ जणांना अटक वर्ग एकचे - १०७ वर्ग दोनचे-१८७ वर्ग तीनचे-१००२ तर वर्ग चारचे-५७ महसुल ४३२ ,पोलीस ४१२, पुणे २२६ नाशिक २१६ मुंबई ९१ २०१५ मध्ये १५८४ जणांना अटक वर्ग एक-७६ वर्ग तर दोन -१२९ वर्ग तीनचे -१०२६ व वर्ग चार -६० महसुल ३९१. पोलीस ३६६. पुणे - २२०, नाशिक - २००, मुंबई - ७२ २०१६ मे पहिला आठवडा- एकूण ४७० जणांना अटक वर्ग एक -१८ वर्ग दोन -२८ वर्ग तीन-३२३ वर्ग चार- १९ एकूण ३४२ महसुल ११०. पोलीस ११५. पुणे -६६. औरंगाबाद -६६. मुंबई -२७
कारवाईत क, ड वर्गातील कर्मचारीच
By admin | Updated: May 22, 2016 00:35 IST