अनंत जाधव : सावंतवाडी, संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी प्रथमच शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाने अभ्यासक्रमात बदल घडवला असून, जुनी ‘सीओई’ पद्धत कालबाह्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व अभ्यासक्रम ‘सीटीएस’ या पद्धतीखालीच सुरू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक काही ‘आयटीआय’ना प्राप्त झाले असून, उर्वरित ‘आयटीआय’ना लवकरच प्राप्त होणार आहे. हा नवीन अभ्यासक्रम आॅगस्टपासून सुरू होणार आहे.महाराष्ट्रातील सर्व ‘आयटीआय’मध्ये ‘सीओई’ म्हणजेच ‘सेंटर आॅफ ऐक्सिलन्स’ ही पद्धत लागू होती. या पद्धतीत सर्व अभ्यासक्रम बेसिक स्वरूपाचे होते. यात फिटर, चिरीमीटर, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल, वेल्डर असे दोन महिन्यांचे अभ्यासक्रम होते. त्याचा हा एक वर्षाचा अभ्यासक्रम करून शिकविण्यात येत होता.या अभ्यासक्रमातील काही त्रुटींमुळे विद्यार्थी कुठल्याच विभागात आपले कौशल्य दाखवू शकत नव्हता. शिक्षणानंतर एक वर्षाचे प्रशिक्षणही मिळत नसल्यामुळे एखाद्या कंपनीत गेल्यास येथील विद्यार्थ्यांचा फारसा प्रभाव जाणवत नसे आणि त्यामुळे विद्यार्थी मागे पडत होते. याचा परिणाम साहजिकच ‘आयटीआय’ प्रवेशावरही होत होता. याबाबत शासनाच्या उच्च तंत्रशिक्षण विभागाने अभ्यास केला आणि काही सूचनांचा विचार केल्यानंतर यावर्षीपासून ‘सीओई’ ही पद्धत कालबाह्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी राज्यातील काही ‘आयटीआय’मध्ये ‘सीओई’ बंद करण्यात येणार असून, पुढच्या वर्षीपासून उर्वरित ‘आयटीआय’मधूनही ही पद्धत बंद करण्यात येणार आहे. तसे परिपत्रक काही ‘आयआटीआय’ना प्राप्त झाले आहे.शासन आता जुनी असलेली ‘सीटीएस’ म्हणजेच ‘शिल्प कारागीर प्रशिक्षण योजना’ लागू करणार असून, त्यातील ‘बेसिक’ हा शब्द काढून आता सर्व कोर्स उपलब्ध करणार आहे. त्याच आधारे प्रत्येक ‘आयटीआय’मध्ये कासारी, जोडारी, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल ऐवजी माहिती तंत्रज्ञान, वेल्डर, आदी अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.या अभ्यासक्रमाची पद्धत आॅगस्टमधील प्रवेशसत्रापासून सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्याला एखाद्या विषयात चांगली चमक दाखवता येईल. तसेच शिक्षणानंतर प्रशिक्षण मिळण्यासही तेवढीच मदत होणार असून, याचा फायदा नोकरीत होणार आहे.सावंतवाडीतील ‘आयटीआय’मध्ये शासनाने या वर्षीपासून प्रथमच माहिती तंत्रज्ञान विभाग सुरू केला आहे. एक महिन्यापूर्वी येथील प्राचार्यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यात माहिती तंत्रज्ञानाबरोबर वेल्डरचीही मागणी केली होती. त्यामुळे आता वेल्डर अभ्यासक्रमाला शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.
‘सीओई’ पद्धत कालबाह्य
By admin | Updated: July 10, 2014 00:28 IST