कणकवली : भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी करतानाच पक्षाची विचारधारा सिंधुदुर्गातील जनतेपर्यंत नव्याने पोहोचविण्यासाठी २१ ते २७ जुलै या कालावधीत ‘कमल शक्ती सप्ताह’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक गुरूवारी कणकवलीत आयोजित करण्यात आली होती. ही बैठक झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, राजू राऊत, जयदेव कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. अतुल काळसेकर म्हणाले, पुढील तीन महिन्यात निवडणूक यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश जिल्हा पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने नुकताच नवीन कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यातील आठही तालुक्यात तो राबविण्यात येणार आहे. सदस्य नोंदणीबरोबरच पक्ष विस्तारासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ प्रत्येक गावातील वाडीवाडीत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. भाजपाचा ‘बिग फ्लॅग’ गावागावात लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ९१३ बुथची पुनर्रचना करण्यात येणार असून त्याचा आढावाही घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रस्त्यावरील झाडांवर रेडीयमची २ लाख कमळे लावण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी वाहनांना ती दिशादर्शक ठरतील तर दिवसा जनतेला ती योग्य दिशा दाखवतील, असा या संकल्पनेमागचा उद्देश आहे. काँग्रेसने मोदी शासनावर टीका करण्यापूर्वी आपल्या पक्षाअंतर्गत काय चालले आहे याचा आधी विचार करावा. ग्रामविकास यंत्रणा खिळखिळी झाली असून सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. हाच विषय घेऊन कमल सप्ताहाच्या निमित्ताने जनतेसमोर जाणार असल्याचेही काळसेकर यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)
भाजपातर्फे २१ पासून ‘कमल सप्ताह’
By admin | Updated: July 10, 2014 23:36 IST