सातारा : काही दिवसात इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ दररोज नवी उसळी घेत आहे. याच इंधनाच्या दरवाढीविरोधात सातारा जिल्हा युवक काँग्रेसने आक्रमक होत, राधिका रोड येथील पेट्रोल पंपावर निदर्शने करत मोदी सरकारचा निषेध केला.
पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्यावतीने राधिका रोड येथील कदम पेट्रोल पंपावर निषेध करण्यात आला. ‘मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी नही चलेगी...’ यांसह अन्य जोरदार घोषणा केंद्र सरकारविरोधात यावेळी देण्यात आल्या.
केंद्र सरकारचे सर्व कायदे जनतेविरोधी असून सर्वसामान्यांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने देशांतर्गत संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. महागाईने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर कमी करावेत व घरगुती गॅसचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, बाबासाहेब कदम, ॲड. दत्तात्रय धनवडे, नरेश देसाई, अतुल पवार, अभय कारंडे, सूरज कीर्तिकर, शरद पवार, ज्ञानेश्वर पवार, रजिम कलाल, रिजवान शेख, एकनाथ पिसाळ आदी उपस्थित होते.