कऱ्हाड : ‘ब्रिटिशांनी भारताचे जेवढे शोषण केले तेवढे शोषण कुठल्याच देशाचे झालेले नाही. हे ओळखलेल्या टिळकांना पहिल्यांदा स्वातंत्र्य हवे होते. मात्र, त्यांनी स्वातंत्र्य हा शब्द न वापरता ‘स्वराज्य’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला. लोकांच्यात ब्रिटिशांच्या विरोधात असंतोष तयार केला. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा पाया रचला, तर महात्मा गांधींनी त्यावर कळस चढविला असे म्हणावे लागते,’ असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
कऱ्हाड येथे दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने ‘लोकमान्य टिळक’ या मराठी अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोरे बोलत होते. विनोद शिरसाठ, रयत साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, प्रा. गणपतराव कणसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. मोरे म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांनी इथल्या जनतेला ब्रिटिशांची शोषकवृत्ती पटवून दिली. स्वराज्याची सर सुराज्याला येत नाही. तेही सांगितले. हे सर्व जनतेला पटल्यावर बहिष्काराचे अस्त्र त्यांनी त्यांच्या हातामध्ये दिले. पुढे महात्मा गांधीजींनी त्याचा चांगला वापर केला. म्हणूनच स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा मार्ग सापडत गेला. खरंतर काँग्रेसच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्य म्हणजे काय? कोणाचे स्वातंत्र्य? कशाचे स्वातंत्र्य? कोणासाठी स्वातंत्र्य? या चर्चा सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात ब्रिटिशांनी शाळा, कॉलेज, रस्ते, रेल्वे आदी सुधारणा केल्या होत्या. त्या जरी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी केल्या असल्या तरी त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीयांना झाला होता. भारतीय शहाणे व्हायला लागले होते.’
विनोद शिरसाठ म्हणाले, ‘ग. प्र. प्रधान व ए. के. भागवत यांनी त्या काळात लोकमान्य टिळकांवर इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेले चरित्र आज मराठीत अनुवादित करण्यात आले आहे. याचा अभ्यासकांना नक्कीच फायदा होईल.’
ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, ‘ दादा उंडाळकर स्मारक समिती नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते. दिवंगत विलासराव पाटील यांनी घालून दिलेल्या मार्गाने आमची वाटचाल सुरू असून, यापुढील काळात ती कायम राहील.’ कार्यक्रमाचे राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो आहे..
कऱ्हाड येथील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना प्रा डाॅ. सदानंद मोरे, व्यासपीठावर गणपतराव कणसे, विनोद शिरसाठ, ॲड. उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते.