पाटण : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात रोज वाढ होत असल्याने धरण भरण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७५.७७ टीएमसी पाणीसाठा झाल्याने धरणातील पाण्याने भिंतीतील सहा वक्र दरवाजांना स्पर्श केला आहे. धरण ७१ टक्के भरले असून धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. साधारणपणे दरवर्षी १५ आॅगस्टपर्यंत धरण भरते. त्यामुळे सहा वक्र दरवाजातून पाणी सोडून धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवला जातो. यंदा मात्र पावसाने पाठ फिरविल्यामुळे गतवर्षीपेक्षा सरसरी एक हजार मिलीमीटर पावसाची गरज आहे. दुसरीकडे कोयनेतील पाण्यावर वीजनिर्मिती अखंडपणे सुरू आहे. कमी पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी आणि वीजनिर्मितीसाठी पाण्याचा वापर सुरू, अशा तिहेरी संकटात कोयना धरण सापडले आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमतेच्या कोयना धरणात अजूनही २५ टीएमसी पाण्याची गरज आहे. एवढा फरक राहून जर धरण पाणीसाठ्याबाबत प्रगती करणार नसेल तर मग वीजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचनाचा प्रश्न उन्हाळ्यात अधिक सतावेल. त्यासाठी कसल्याही परिस्थितीत धरण भरले पाहिजे. इतिहास पाहिला तर सप्टेंबरमध्ये धरण भरण्याच्या घटना नोंद आहेत. (प्रतिनिधी)
कोयनेचे पाणी वक्र दरवाजांना टेकले
By admin | Updated: August 9, 2015 00:48 IST