सातारा : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (गुरुवारी) सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचारी अगदी वेळेत कार्यालयात उपस्थित राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कर्मचारी दिलेल्या वेळेत कार्यालयात हजर राहणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची धांदल उडालेली पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, सामान्य प्रशासन, कूळ कायदा, संजय गांधी निराधार योजना, लेखा विभाग, अपील, ग्रामपंचायत निवडणूक विभाग, पुरवठा विभाग तसेच खनिकर्म विभाग असे विविध विभाग आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा सुरू करण्यात आली असल्याने वर्षाच्या पहिल्याच दिवशी बटनावर बोट ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची धांदल उडाल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये वर्ग ३ व ४ दर्जाचे १४० कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी वेळेत कामावर हजर झाले. शासकीय कामाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६.४५ ही आहे. वर्ग ३ व ४ दर्जाच्या कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. त्यांची हजेरी या माध्यमातून लागते. त्यासोबतच मस्टरही ठेवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्याच्या वेळेवर शासनाने बंधन घातले असले तरी जाण्याच्या वेळेवर कुठलीही मर्यादा नाही. कामेच संपत नसल्याने रात्री उशिरापर्यंत कार्यालयात काम करावे लागते. मात्र, या कामाचा ओव्हरटाईम दिला जात नसल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)...आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पहाराजिल्हााधिकारी कार्यालयाच्या आवारासह इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोज आंदोलने होत असतात. काही वेळेस अनुचित प्रकारही घडत असतात. या प्रकारांना आळा बसावा, या हेतूने सुरुवातीच्या टप्प्यात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. माझ्या केबीनमध्येही कॅमेरे बसविण्याची सूचना मी केली आहे, अशी पुष्टीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी जोडली.
पहिल्याच दिवशी ‘अंगठेबहाद्दर’ वेळेत!
By admin | Updated: January 2, 2015 00:08 IST