पाटण : पाटण पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडीत बोगस जातप्रमाणपत्र दाखवून सभापती होण्यास निघालेल्या देसाई गटाच्या मारुल हवेली गणातील सदस्या सुमन जाधव (रा. दिवशी बुद्रुक) यांना पाटण पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.सभापतिपदाच्या हव्यासापोटीच बोगस जातप्रमाणपत्र मिळविण्याचा प्रकार सुमन जाधव यांनी केला आहे,’ असा आरोप सभापती संगीता गुरव यांनी केला आहे. सुमन जाधव यांनी कुणबी (मराठा) या बोगस जात प्रमाणपत्रावर पाटणकर गटाशी सभापतिपदाचा खेळ खेळला. मात्र, पाटणकर गटाच्या ओबीसी प्रवर्गातील संगीता गुरव यांची चिठ्ठी निघाली. त्यानुसार त्या सभापती झाल्यानंतर पाटणकर गटाचे पंचायत समिती सदस्य राजेश पवार यांच्या शंका आल्याने त्यांनी या प्रमाणपत्राचा छडा लावला. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथील जातप्रमाणपत्र पडताळणी केंद्रात अर्ज केला. त्यावेळी सुमन जाधव यांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. सुमन जाधव यांच्याकडे असलेले ‘८५०८०४’ या क्रमांकाचे प्रमाणपत्र त्याच क्रमांकाचे दुसऱ्या व्यक्तीकडे असलेले प्रमाणपत्रावरून बोगस असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण? आणि बनावट दस्ताऐवज कोणी तयार केले, याचा पोलीस शोध घेत असून, त्यादृष्टीने सुपन जाधव यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास धस यांनी दिली. (प्रतिनिधी)
बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी सुमन जाधव यांना अटक
By admin | Updated: September 20, 2014 00:37 IST