कराड : कोरोनाच्या महामारी संकटाने सर्वांनाच हैराण करून टाकले आहे. दक्षता म्हणून शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद केले आहेत. दुसरीकडे नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात राबविली जात आहे, पण या सगळ्यांत योद्धात कार्यरत असणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांना आज लस दिली जात नाही. कराडला उपजिल्हा रुग्णालयात तर तसे नोटीस बोर्डवरच लिहिले आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गत वर्षभरापासून घोंगावत असणारे कोरोनाचे वादळ काही केल्या थांबायला तयार नाही. त्यामुळे गतवर्षी अत्यंत कडक लाॅकडाऊन करण्यात आला होता. आता दुसऱ्या लाटेने डोके वर काढल्यावर कडक निर्बंध लावले आहेत. पण या सार्यांत अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक सेवेत बँकांचा समावेशही शासनाने केला आहे. शासन त्यांना बँका सुरू ठेवायला सांगते; त्यांना स्वतःची कोरोना चाचणी करण्यासाठी आग्रह धरते. पण लस देताना मात्र फ्रंटलाइन वर्करमध्ये तुम्ही येत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे केवळ ४५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांनाच कोरोना लस दिली जाईल हे सांगणे चुकीचे वाटते. सध्या बँकेमध्ये काम करणारे बहुसंख्य कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. अशावेळी त्यांच्या लसीकरणाचा विचार व्हायला हवा.
जिल्ह्यातील मुख्य अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्रव्यवहार केला होता. बँक कर्मचाऱ्यांचा थेट लोकांशी संपर्क येतो. तेव्हा त्यांना लस देताना प्राधान्य द्यावे यावर ५/४ /२०२१ रोजी निवासी जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी सातारा यांना पत्र पाठवून बँक कर्मचाऱ्यांना तत्काळ लसीकरण करावे असे सूचित केले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
आज प्रत्यक्षात ४५ वर्षांवरील बँक कर्मचाऱ्यांना सर्वांच्या बरोबरने लस दिली जात आहे. पण कमी वय असलेले बँक कर्मचारी यापासून वंचित आहेत. ते लसीकरणासाठी गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र दाखवूनही तुम्ही फ्रंटलाइन वर्कर नाही, असे सांगितले जात आहे. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय तर चक्क बँक कर्मचाऱ्यांना लस देणे बंद आहे, असे नोटीस बोर्डवरच लिहिले आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
चौकट
.. मग त्यांचे लसीकरण का नाही?
जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशावरून काही दिवसांपूर्वी महावितरण कर्मचाऱ्यांना कोविड लसीकरणात प्राधान्य देण्यात आले आहे. मग त्याच जिल्हाधिकाऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य द्या, असे आदेश दिले असताना त्यांचे लसीकरण प्राधान्याने का होत नाही हा प्रश्न आहे.
चौकट
फ्रंटलाइन वर्करची व्याख्या काय?
फ्रंटलाइन वर्कर ना कोरोना लस प्राधान्य देण्याची गरज आहे. पण प्रशासनाने जा कर्मचाऱ्यांचा संबंध थेट कोरोना रुग्णांशी किंवा कोरोना कामाशी येतो. त्यांचा समावेश फ्रंटलाइन वर्कर म्हणून केलेला दिसतोय .म्हणजे त्यात डॉक्टर नर्स यांचा समावेश होईल. पण ते सोडूनही अनेक नोकर कोरोनाच्या लढाईत योद्ध्यांचे काम करीत आहेत. त्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला नको काय ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
कोट
बँक कर्मचाऱ्यांना कोरोना लस देताना प्राधान्य आहे. त्यासाठी त्यांनी संबंधित ॲपवर स्वतःची माहिती भरणे आवश्यक आहे. ती माहिती व्यवस्थित सबमिट झाली की त्यांना लगेच लस मिळायला काही अडचण येणार नाही.
डॉ. संगीता देशमुख
तालुका वैद्यकीय अधिकारी
कोट
शासनाने अत्यावश्यक सेवेत बँकांचा उल्लेख करून त्या सुरू ठेवायला सांगितले आहे .बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी कागदपत्रे देवाण-घेवाण करताना, पैशांची देवाण-घेवाण करताना कर्मचाऱ्यांचा संबंध येतो. समोरचा ग्राहक बाधित आहे की नाही हे माहीत नसते
त्यामुळे कर्मचारी बाधित होण्याचा धोका मोठा आहे. अशावेळी वयाची अट न लावता बंक कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली पाहिजे. पण ती आज दिली जात नाही.
ज्योती कदम
कृष्णा सहकारी बँक, कराड
फोटो
1निवासी जिल्हाधिकारी पत्र
2कराड उपजिल्हा रुग्णालयातील नोटीस बोर्ड